इचलकरंजी प्रतिनिधी /महान कार्य वृत्तसेवा
केबल जोडणी सर्व्हे करणार्या तत्कालीन करमणूक कर निरिक्षकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणातून माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे याची येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यअभावी निर्दोष मुक्तता केली. तेलनाडे याच्या वतीने अॅड. सचिन माने यांनी काम पाहिले.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, 7 मार्च 2012 रोजी शासकीय करमणुक कर विभागातील तत्कालीन करमणुक कर निरीक्षक प्रदिप अशोकराव शिंदे हे पिराचा मळा गावभाग येथे केबल जोडणीचा सर्व्हे करत असताना एसटीएन केबल नेटवर्क्सचे मालक संजय तेलनाडे याने केबल सर्व्हे करायचा असे सांगत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सर्व्हे केल्यास जिवे मारण्याी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावभाग (इचलकरंजी) पोलिस ठाण्यात तेलनाडे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तेलनाडे याच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान फिर्यादी, घटनास्थळावरील पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे साक्षीपुरावे तसेच इतर महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आले.
फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीत असलेली विसंगती तसेच आरोपीने फिर्यादी यास त्याचे कर्तव्य बजावत असताना फौजदारीपात्र बळाचा वापर करुन, हल्ला करून शासकीय कर्तव्य करण्यापासून रोखले अथवा परावृत्त केले नाही असा बचाव आरोपीतर्फे अॅड.सचिन माने यांनी मांडला. अॅड.माने यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी माजी नगरसेवक संजय तेलनाडे याची निर्दोष मुक्तता केली.
