इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
येथील पंचगंगा नदी तीरावर असणाऱ्या स्मशानभूमीत असणाऱ्या पत्र्यांची दुरावस्था झाली होती पत्रे फुटल्याने पाणी थेट अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी पडत होते याची दखल घेऊन दैनिक महान कार्याने वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची दखल घेत प्रशासनाने पत्रे बदलण्याचे काम हाती घेतले आणि दोनच दिवसांपूर्वी एक शेडचे पत्रे पूर्णपणे बसवण्यात आले. दुसऱ्या शेडचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्मशानभूमीतील पत्रे फुटल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करण्यामध्ये अडचण येत होती. वादळी पावसाने पाणी अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी पडण्याची शक्यता असल्याने बऱ्याच नागरिकांनी याबाबत तक्रार देखील केली होती. चाणक्य अंत्यसंस्कार संस्थेचे प्रमुख जवाहर छाबडा यांनी देखील पत्रांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता तर महान कार्य देखील याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली होती. पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याने नागरिकांनी बाकी समाधान व्यक्त केले.
हळवणकरांचा पुढाकार आणि आयुक्तांची तत्परता
स्मशानभूमीत होणारी ही कुचंबना लक्षात घेऊन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पुढाकार घेत प्रशासनाशी संपर्क साधला. तर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी तत्परता दाखवत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी करत काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
