मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं माजी व्यवस्थापक हितेश मेहता यांच्यासह 10 आरोपींविरोधात 12 हजार 634 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. 122 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. आरोपपत्राद्वारे बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू, त्यांच्या पत्नी गौरी भानू यांना फरार आरोपी घोषित करण्यात आलेलं आहे.
फरार आरोपींविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी- फरार आरोपी दाखवण्यात आलेल्या हिरेन आणि गौरी भानू यांच्याविरोधात इंटरपोलनं ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला दिली. याप्रकरणी हितेश मेहता, धर्मेश पौन, अभिमन्यू भोअन, उल्हनाथन अरुणाचलम, त्याचा मुलगा मनोहर, कपिल देढिया, जावेद आझम आणि राजीव रंजन पांडे या अन्य आठ आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बँकेचे ऑडिट करणाऱ्या अभिजित देशमुख, लक्ष्मीनारायण नायक, मेसर्स एस. आय. मोगल कंपनीचे सुभाष मोगल, अजय राठोड, पवन जैस्वाल आणि शौकत जामदार या व्यक्तींचाही शोध सुरू असून, त्यांच्याविरोधात लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असं ईओडब्ल्यूनं कोर्टाला सांगितलंय.
ईओडब्ल्यूनं दाखल केलेल्या आरोपपत्रात काय म्हटलंय?- याप्रकरणी ईओडब्ल्यूनं 55 पंचनामे केलेत. या आरोपपत्रात एकूण 44 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातील आठ साक्षीदारांची भारतीय नागरी सुरक्षा कायदा कलम 183 अंतर्गत साक्ष नोंदवण्यात आली आहे. याशिवाय 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्तांवर टाच आणलेली आहे. त्यात पाच आरोपींच्या मालकीच्या या मालमत्ता महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार राज्यांमध्ये आहेत. ज्यात हितेश मेहता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे सात सदनिका, एक दुकान आणि एक बंगला अशी एकूण किंमत 12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची अंदाजे किंमत 150 कोटी – आरोपी अरुणाचलमच्या नावे एक दुकान ज्याची किंमत 1.5 कोटी, आरोपी कपिल देडिया याच्या नावावर असलेली 75 लाखांची सदनिका, आरोपी जावेद आझम याच्या शोरूममधून जप्त केलेल्या 55 लाखांच्या विद्युत वस्तू, मधुबनी येथील दुकान ज्याची किंमत 55 लाख, पटना येथील सदनिका ज्याची किंमत 50 लाख अशा मिळून दीड कोटींच्या मालमत्ता तसेच बिहारमधील दहा दुकानांसाठी दिलेले 2.5 कोटी रुपयांचे भाडे, आरोपी धर्मेशचा 40 हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प ज्याची अंदाजे किंमत 150 कोटी रुपये आहे, अशा मालमत्तांचा समावेश आहे. ईडीकडूनही समांतर तपास सुरू- या घोटाळ्याचे मास्टरमाईंड हितेश मेहता यांनी साल 2019 पासून टप्प्याटप्यानं बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेतून 122 कोटींची रोकड परस्पर काढून अरुणाचलम, पौन आणि अन्य आरोपींना दिली. या आरोपींनी ही रक्कम आपापल्या व्यवसायांमध्ये गुंतवली. फेब्रुवारी 2025 मध्ये हा घोटाळा उघड झाला. या घोटाळ्याचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) सुरू आहे. यातील 45 कोटी रुपये भानू दाम्पत्यानं परदेशात नेल्याचा ईडीचा आरोप आहे.
