Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. प्रीती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी यूपीएससी अध्यक्षपद रिक्त झालं होतं. यानंतर या पदासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, अजय कुमार हे केरळ केडरच्या 1985 च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 23 ऑगस्ट 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत संरक्षण सचिव म्हणून काम पाहिलं होतं.

डिजिटल इंडिया प्रकल्प राबविण्यात महत्त्वाची भूमिका : अजय कुमार हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते संरक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, अग्निवीर योजना, आत्मनिर्भर भारत उपक्रम आणि आयुध कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन यासारख्या संरक्षण दलातील परिवर्तनकारी सुधारणांचं नेतृत्व केलं. याचबरोबर, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयातील एक उच्च अधिकारी म्हणून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यूपीआय, आधार आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस सारखे डिजिटल इंडिया प्रकल्प राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मिनेसोटा विद्यापीठातून पीएचडी : भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अजय कुमार यांनी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2012 देखील तयार केलं. याचबरोबर, अजय कुमार यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सरकारांसोबत काम केलं आहे. तसंच केंद्र सरकार आणि केरळ सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत, ज्यात केल्ट्रॉनचे प्रधान सचिव आणि एमडी म्हणून काम केलं आहे. याशिवाय, अजय कुमार यांनी मिनेसोटा विद्यापीठातून बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशनम्ध्ये पीएचडी आणि अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये एमएस केलं आहे, हे त्यांनी फक्त तीन वर्षांत पूर्ण केलं. याव्यतिरिक्त, ते आयआयटी कानपूरमधून बी.टेक पदवीधर आहेत. यूपीएससी अध्यक्षांचा कालावधी किती? : दरम्यान, आयएएस, आयएफएस आणि आयपीएस यासह इतर पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) परीक्षा घेतली जाते. या आयोगावर एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 10 सदस्य असतात. सध्या आयोगात दोन सदस्यांची पदे रिक्त आहेत. तर यूपीएससी अध्यक्षांची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा त्यांचे वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत केली जाते.