१८ तारखेला उन्हाळ्यात लोकांचा महापूर दिसेल, अंकलीत होणार चक्काजाम
शिरोळ तालुका बंद ठेवून आंदोलनात सर्वांनी पूरग्रस्त म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठ्याच्या जनतेला जीवघेणा ठरत असलेला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाची सध्याची 519 मीटर असलेली उंची वाढवून ती 524 मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे मागणी करत आहे. केंद्राने उंची वाढवण्यास परवानगी देऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार कायदेशीर विरोध करायला तयार नाही. अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात रविवारी दि. १८ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता अंकली टोल नाक्यावर सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. सर्व पक्ष, संघटना मिळून एकजुटीने अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार बुधवारी शिरोळ येथे सर्वपक्षीय नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
रविवारी शिरोळ तालुका बंद ठेवून सर्वांनी पूरग्रस्त म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आंदोलनाच्या नियोजनासाठी तालुकास्तरीय बैठक आज गुरुवारी दत्त कारखान्याच्या दत्ताजीराव कदम सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शिरोळ येथील शासकीय विश्रामधाम येथे शिरोळ तालुक्यातील सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये रविवारी गट, तट, पक्ष संघटना विसरून पूरग्रस्त म्हणून सर्वांनी अंकली येथील चक्काजाम आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सर्व पक्षीय नेत्यांकडून करण्यात आले.
अलमट्टी धरणात 519.66 मीटर उंचीने प्रथमच पाण्याची पातळी 2005 मध्ये केली. आणि त्याचवर्षी महाराष्ट्रात महापूर आला. त्यानंतर सरासरी पेक्षा जादा पाऊस ज्या-ज्या वेळी पडला, त्या त्या वर्षी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आलेला आहे. या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास आलमट्टी धरण जबाबदार असल्याचे अनेक अहवाल शासनास सादर झाले आहेत. पण राज्य सरकार याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही. म्हणूनच कर्नाटक सरकार यावर कहर म्हणून या धरणाची आणखी उंची वाढवून मिळावी, याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.
लागोपाठ महापूर येऊन या भागाचे आर्थिक सामाजिक नुकसान होउनही, सरकार या महापुरास कारणीभूत असलेल्या या धरणाबाबंतीत गाफिल आहे. त्यामुळे या भागातील. नागरिकांना आंदोलन करून सरकारचे लक्ष या गभीर धोक्याकडे वेधण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा निर्णय रद्द करत नाही. तोपर्यंत हे सर्व पक्षीय आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिरोळ तालुक्यातील सर्व पूर बाधित नागरिकांनी रविवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता अंकली टोल नाका येथे आपल्या वाहनासह येऊन चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन संघर्ष समितीकडून शेवटी करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले की, अलमट्टी धरणामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान होते. धरणाची उंची वाढू नये यासाठी राज्य शासनाकडून अद्याप कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाला जाग आणण्याकरिता लोक लढ्याची आवश्यकता आहे. यासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन करून अलमट्टी उंची वाढी विरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील म्हणाले की, अलमट्टी धरणामुळे सर्वात जास्त फटका शिरोळ तालुक्याला बसून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अलमट्टी धरणाची पुन्हा उंची वाढली तर शिरोळ तालुक्याची भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. हे टाळण्याकरिता अलमट्टी धरण उंची वाढीला विरोध करणे आवश्यक आहे. यासाठी रविवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी गुरुवारी सकाळी दत्त कारखान्यावरील दत्ताजीराव कदम सभागृहात तालुकास्तरीय नियोजनाची बैठक आयोजित केली आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की, महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरण उंची वाढीविरोधात लढा उभा करण्याची गरज आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकजुटीने अलमट्टी उंची वाढीला विरोध केला आहे. शासनाला जागे करण्यासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन अंकली पुलावर करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी शिरोळ तालुका बंद ठेवून नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, कृष्णा महापूर समितीचे सर्जेराव पाटील यांनीही आपले मत व्यक्त करून चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, युवानेते आदित्य पाटील यड्रावकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर मादनाईक, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, ठाकरे शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे, चंगेजखान पठाण, राजू आवळे, अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील, रयत क्रांती संघटनेचे शहाजी गावडे, आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, राकेश जगदाळे, कृष्णा गावडे, कृष्णा महापूर समितीचे ओंकार दिवाण, चंद्रकांत पाटील, पेडणेकर, भारत पाटील भुयेकर, मारुती पाटील, शैलेश आडके, विश्वास बालिघाटे, नितीन बागे, आदम मुजावर, यांच्यासह शिरोळ तालुक्यातील नेतेमंडळी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
