मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीश पदावर रुजू होत आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई हे अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभले आहेत. तसेच ते पहिले बौद्ध सरन्यायाधीश असल्याने भारतीय न्यायव्यवस्थेच्या व्यापक आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून त्यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते.
राष्ट्रपती भवनात बी आर गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बी आर गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. संविधानाच्या कलम 124(2) अंतर्गत गवईंचे नियुक्तीपत्रक काढण्यात आले, ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब करत त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. न्यायमूर्ती भूषण गवई मे 2019 पासून सर्वोच्च न्यायालयात रुजू झाल्यापासूनच, देशासाठी प्रमुख निर्णयांत महत्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या 6 वर्षांत ते 700 खंडपीठांत सहभागी होते. ज्यामधून त्यांनी जवळपास 300 निर्णय घेतले. त्यांनी प्रशासकीय, दिवाणी, फौजदारी, व्यावसायिक आणि पर्यावरणीय कायद्यांसाठी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत.
