गावात तणावाचे वातावरण, छत्रपती शिवाजी चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप
टाकवडे / महान कार्य वृत्तसेवा
टाकवडे ता. शिरोळ येथे बुधवारी मध्यरात्री विना परवाना छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. ही घटना सकाळी समजताच पोलीस, महसूल प्रशासन तातडीने गावात दाखल झाले. गावात तणावाचे वातावरण असून छ.शिवाजी चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रशासन पातळीवर पुतळा काढण्याचा निर्णय झाल्याने जमावबंदीचा आदेश लागू केलाय. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकवडे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतसमोर छ.शिवाजी चौकात चबुतरा उभारून त्यावर छ.शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी समजताच गावातील ग्रामस्थ, युवक छ.शिवाजी चौकात जमले. प्रशासनाला याची माहिती मिळताच प्रांताधिकारी मौसमी चौगुले बर्डे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, डीवायएसपी रोहिणी सोळंके, शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह महसुल प्रशासनातील अधिकारी यांनी बैठक घेवून बसवलेला पुतळा हा विना परवाना, बेकायदेशीर असून तो हटवण्यात यावा अशी भूमिका घेतली. याला ग्रामस्थ व युवकांनी विरोध केला.
प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करून संबधितावर गुन्हे दाखल करण्याचे सांगितल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पुतळा उभारणार्यावर व याचे समर्थन करणार्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान शिवप्रेमी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात बंद खोलीत चर्चा सुरू होती. प्रशासन पातळीवर पुतळा काढण्याचा निर्णय झाल्याने जमावबंदीचा आदेश लागू केलाय. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गावचा उरूस उद्या 15 मे पासून सुरू होणार आहे. त्यातच जमाव बंदी आदेश लागू केल्याने उरूस होणार की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलंय.
