CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 50
Spread the love

स्वबळाचा नारा : पण राजकीय निरिक्षकांच्या मते हा ‘चकवा’च


कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सर्वच पक्ष जरी स्वबळाचा नारा देत असले, तरी हा राजकीय ‘चकवा’ च आहे. महायुती व महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरेल असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुका प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र लढवायच्या घोषणा करत असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र आघाड्यांकडूनच निवडणूक लढविली जाईल असा अंदाज राजकीय चाणक्य व्यक्त करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षापेक्षा गटातटाला महत्त्व असल्याने  उमेदवाराच्या ताकदीचा उपयोग सर्वच पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्यावर काही नेत्यांचा प्रयत्न आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक स्वतंत्र लढवायची आणि निकालानंतर आघाडी किंवा युती करून सत्ता स्थापन करण्याची रणनीती कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आखली जात असल्याचा फार्स केला जात असला तरी मतविभाजनाच्या धोक्यामुळे तो चकवा असल्याचे म्हटले जात आहे.
तथापि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील पुनर्रचना होणार या धास्तीने अनेकांनी ’वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, या मतदारसंघाची पुनर्रचना न होता थेट आरक्षण निश्चित होणार आहे. 2012 आणि 2017 च्या निवडणुकीचे आरक्षण वगळून इतर मतदारसंघावर आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील राजकीय अंदाज घेऊन अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.  मागील निवडणुकीतील परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेे वर्चस्व राहिले आहे. भाजपचेही तेच तेच सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात होते. मात्र जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी एकत्र आल्याने त्यावेळी काँग्रेसच वरचढ ठरले.

राजकीय पक्षांची भाऊगर्दी वाढली आहे. महायुतीमधील भाजप शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती हे चार पक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत असल्याचे दाखवत असले तरी त्यांना ते परवडणारे नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत येणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कार्यकर्ता जपण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे नेत्यांपुढे उमेदवारीचे आव्हान निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस वगळता राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे नेतृत्वच नाही. कार्यकर्ता आणि पदाधिकारी शोधण्याची वेळ नेतृत्वापुढे आले आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावरच असणार आहे.