Spread the love

आटपाडी / महान कार्य वृत्तसेवा

१९३६ ते १९५० पर्यत मुस्लीम खाटीक वगैरे मुस्लीम मागासांना सुरू असलेली S . C आरक्षण सवलत नवमुस्लीम म्हणून या अतिमागास मुस्लीमांना पूर्ववत चालु करणेबाबत राष्ट्रीय नेते खा . शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधीमंडळ आणि संसदेत जोरदार प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे राज्याचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाच्या शिष्टमंडळाने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रीय नेते खा.  शरदचंद्रजी पवार साहेबांशी सुसंवाद साधला. त्यावेळी आपल्या भाषणात सादिक खाटीक यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
                यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार राज्यभरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व ते सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली. तसेच ओबीसी विभागाच्या पुढील वाटचाली संदर्भात विस्तृत विचारविनिमय केले.  राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्याचे युवक नेते युगेंद्र पवार आणि ओबीसी सेलचे राज्यप्रमुख   राज राजापूरकर, ॲड . संजय ठाकरे गडचिरोली – चंद्रपूर, भास्कर पंडागळे – नाईक यवतमाळ, डॉ . पंकज पवार चंद्रपूर, डॉ तय्यबा शेख मुंबई – नाशीक, जालींदर कटरे आटपाडी, सांगली , असिफ खलीपे, सलीम बेग, अकबर चौगुले, कडुबा हिवाले संभाजीनगर, प्रकाश चव्हाण कल्याण, विजय नवकरे भंडारा, अतुल राऊत पुणे, व्यंकटेश चामनर बीड, दत्ता अनारसे नाशीक, सुधीर गोरे कटगुण सातारा, अरुण तोडकर सोलापूर, यशवंत ठाकरे रत्नागिरी, अशोक सुर्यवंशी नवी मुंबई, विवेक जगदाळे ठाणे, योगेश हिवलकर जळगांव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सादिक खाटीक पुढे म्हणाले, १९३६ ते १९५० या दरम्यान बंगालचे बौद्ध आणि देशातील ख्रिश्चन यांना वगळून इतर सर्वधर्मीय मागासांना एस . सी ., एस . टी. ची सवलत मिळत होती . १९५० साली राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी काढलेल्या घटनेखालील अध्यादेशाने एस . सी . एस . टी . ची आरक्षण सवलत फक्त हिंदू धर्मीयांपुरती मर्यादित करण्यात आली . नंतरच्या घटना दुरुस्तीतून एस . टी . सवलतीला निधर्मी अर्थात सर्वासाठी खुले करण्यात आले . आणि एस . सी . आरक्षण सवलतीमध्ये मागास शीख आणि धर्मांतरीत नवबौध्द बांधवांचा समावेश करण्यात आला . धर्मांतराने बौद्ध झालेले नवबौध्द बांधव पुर्वाश्रमीचे दलित होते हे मान्य करून त्यांचा S . C . त पुन्हा समावेश करण्यात आला. मुस्लीमांच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या विविध कमीशन, समिती , अभ्यासगट, आयोगाने काढलेल्या निष्कर्षात, बहुतांश भारतीय मुस्लीम धर्मांतरीत असल्याचे म्हटले आहे . याचा अर्थ पूर्वाश्रमीचे हिंदू परिट धर्मांतराने मुस्लीम धोबी बनले, हिंदू माळी धर्मांतराने मुस्लीम बागवान बनले, हिंदू चांभार धर्मांतराने मुस्लीम मोची झाले . हिंदू नाभीक धर्मांतराने मुस्लीम हजाम बनले . हिंदू मेहतर धर्मांतराने मुस्लीम मेहतर झाले, पुर्वाश्रमीचे हिंदू खाटीक धर्मांतराने मुस्लीम खाटीक झाले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन धर्मांतरीत मुस्लीम खाटीक, मुस्लीम मोची, मुस्लीम मेहतर वगैरे अतिमागास मुस्लीम बांधवांचा नवमुस्लीम म्हणून पुन्हा एस . सी . आरक्षण कक्षेत समावेश केला पाहीजे . ओबीसी आरक्षण कक्षेच्या विशाल प्रवर्गात या अतिमागास मुस्लीमांच्या हाती फारसे काही येत नाही . यासाठी आपण मुस्लीम आणि मुस्लीम मागासांचे नेतृत्व करावे अशी आमची आग्रही अपेक्षा व्यक्त केली.