Spread the love

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

टेंडर काढा, ठेकेदार नेमा आणि ‌‘टक्केवारी’ मिळवा, या महापालिकेतील सुरु असलेल्या प्रवृत्तीला अलिकडच्या काळात चाफ लागलेला दिसत आहे. शहरातील एका सारण गटारीच्या प्रकरणात महापालिकेची तब्बल 4 कोटींची बचत झाली आहे. आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांच्या परफेक्ट नियोजनामुळे हा बदल दिसून येत आहे.

इचलकरंजी महापालिका आणि ‌‘टक्केवारी’ हे सुत्र नवीन नाही. कोणत्याही कामाचे टेंडर काढण्यापुर्वीच कारभाऱ्यांची ‌‘टक्केवारी’च्या चर्चेचे सोपस्कार पार पाडल्यानंतरच पुढील कार्यवाही व्हायची, चर्चा करायची, सौदा पक्का झाला की, मानपान ठेवलेल्या ठेकेदाराला अटी घालून ठेका द्यायचा, त्यानंतर तो काय काम करतो, किती काम करतो याकडे कुणीही गांभीर्याने पहात नसे, केवळ आणि केवळ टक्केवारीची चर्चाच यासाठी कारणीभूत रहायची, ठेकेदार आणि टक्केवारी ही पालिकेतील आजपर्यंतची परंपरा होती. परंतु पालिकेच्या सभागृहाची मुदत संपली आणि कारभाराची सुत्रे प्रशासनाच्या हातात घेतली. तेंव्हापासून काही प्रमाणात टक्केवारीला चाफ लागल्याचे दिसते. तत्कालिन प्रशासक डॉ.प्रदीप ठेंगल यांची वादग्रस्त कारकिर्द वगळली तर महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर देशमुख, ओमप्रकाश दिवटे आणि आताच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली टक्केवारीला 100 टक्के नसला तरी बऱ्यापैकी चाफ लागलेला आहे.

महापालिकेत अपवाद वगळता काही विभागात ‌‘टक्केवारी’ तर झिरोवर आली आहे. प्रशासकीय ही कारकिर्द नव्याने सभागृहात येणाऱ्या कारभाऱ्यांना धडा देणारे आणि भविष्यात कसा कारभार करावा लागेल, याची पायवाट घालून दिल्याचे दिसते.

शहरातील सारण गटारीच्या स्वच्छतेच्या निमित्ताने हे दाखवून दिलेले आहे. 255 सारण गटारींच्या स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहेत. यातील 205 सारण गटारी आतापर्यंत स्वच्छ करण्यात आल्या असून तब्बल 70 टक्के काम पुर्ण झाले आहे. नगरपालिका अस्तित्वात असताना सारण गटारीच्या स्वच्छतेसाठी तब्बल 50 लाख रुपये निधी पालिकेच्या तिजोरीतून खर्च करावा लागत  होता. परंतु प्रशासकीय कारकिर्द सुरु झाल्यानंतर 6-7 वर्षात एकदाही टेंडर काढण्यात आले नाही. महापालिकेच्या आहे त्या कर्मचाऱ्यांना कामास लावून सारण गटारीची स्वच्छता करण्याचे धोरण स्विकारण्यात आले. आणि वर्षाला 50 लाख रुपयांप्रमाणे आतापर्यंत पालिकेचे तब्बल 4 कोटी रुपये वाचले आहेत. याचे संपूर्ण योगदान आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांना द्यावे लागेल.

आर्थिक भार कमी केल्याचे समाधान
आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यापुर्वी सारण गटारी स्वच्छता करण्याचे ध्येय ठेवून कामाला सुरुवात केली. यात यशही मिळाले. तसेच महापालिकेचा आर्थिक ताण कमी केल्याचेही समाधान आहे.

  • डॉ.सुनिलदत्त संगेवार
    आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महापालिका