ढगांचा गडगडाट आणि कडाडणाऱ्या विजेसह पावसाची हजेरी
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगलेसह परिसराला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वळवाच्या पावसाने अक्षर झोडपून काढली आकाशात ढगांचा गडगडात आणि कडाडणाऱ्या विजेसह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाला चांगला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान अचानक पणे सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. सामानांची बांधाबाध करताना व्यापारी वर्गाची त्रेता उडाली होती. आज मंगळवार हातकणंगलेचा बाजाराचा दिवस शहरवासीयांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार खरेदीसाठी बाजारात आले होते. अचानकपणे धुवाधार पाऊस सुरू झाल्यामुळे एकच धावपळ उडाली, मिळेल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह ग्राहकानी आश्रय घेतला. अशीच परिस्थिती, इचलकरंजी, कुंभोज, कोरोची, आळते येथे पहावयास मिळाली. सुमारे तासभर धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे बघेल तिकडे पाणीच पाणी दिसत होते. सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाका जाणवत होता. गेले दोन दिवसांपासून ढग दाटून येत होते. परंतु सायंकाळच्या वेळी वाऱ्याच्या वेगाने ढग निघून जात होते. त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. या उस्मामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले. विजेचा कडकडाट सुरू झाला. वारेही प्रचंड वेगाने वाहत होते. साडेपाच वाजता पावसाने सुरुवात केली. वाऱ्याचा प्रचंड वेग होता. त्यामुळे काही ठिकाणी झाडे उनमळून पडली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून पाऊस सुरू असलेल्या भागातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. आणखीन दोन दिवस अशाच स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
