तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी यांची वारंवार होणारी बदली ही गावाच्या विकासासाठी एक मोठी अडचण ठरत आहे. गेल्या काही वर्षांत या ग्रामपंचायतीत स्थिर ग्रामपंचायत अधिकारी मिळालेला नाही.
आठ – दहा महिन्यांनंतर नव्या अधिकारी नियुक्ती होते आणि काहीच वेळात त्यांची बदली होते. यामुळे प्रशासनातील सातत्य हरवत असून, शासकीय योजनांची अंमलबजावणी खोळंबते आहे.प्रत्येक नवीन अधिकारी यांना गावाची माहिती घेण्यातच वेळ जातो. त्यानंतर योजना, लाभार्थी, निधी यांची प्रक्रिया सुरू होत असतानाच त्यांची बदली होते. परिणामी, रस्ते, गटर्स , कागदोपत्री नोंदी , घरकुल प्रस्ताव यांसारखी विकासकामे अर्धवट राहतात. अनेक वेळा नागरिकांना कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अधिकारी यांची सही घ्यावी लागते.
ग्रामपंचायत अधिकारी सतत बदलत असल्यामुळे गावाच्या समस्या मुळापासून समजून घेणारा अधिकारी मिळत नाही. या बदल्यांमागे राजकीय हस्तक्षेप, स्थानिक वाद, किंवा व्यक्तिकेंद्रित तक्रारी कारणीभूत असल्याची शक्यता ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी एकत्र येऊन या बदल्यांच्या मागची खरे कारणे शोधायला हवीत.त्यामुळे ग्रामस्थांनी सजग राहून या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि पारदर्शकतेची मागणी करणे काळाची गरज आहे.या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि पंचायत समितीकडे ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली असली तरी अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. गावकऱ्यांची मागणी आहे की, खोतवाडी ग्रामपंचायतीला एक स्थिर, कर्तव्यदक्ष , कायमस्वरूपी आणि अनुभवी अधिकारी नेमावा, जो दीर्घकाळ गावात राहून शासकीय योजना प्रभावीपणे राबवू शकेल.वारंवार बदल्यांमुळे होणाऱ्या गैरसोयी थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.
