Spread the love

 इतरत्र असणाऱ्या सर्व बसेस परत देणार : प्रवीणभाई माणगावे

आमदार प्रसाद लाड यांनी साधला समन्वय

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा

कुरुंदवाड आगारामध्ये बसेसची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंद झाल्याचा फटका शिरोळ तालुक्यातील जनतेला बसत आहे. त्यामुळे या आगारामध्ये एसटी बसेसची संख्या वाढवावी. एसटी फेऱ्या पूर्ववत कराव्यात. अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली. दरम्यान परिवहन मंत्री ना.प्रतापराव सरनाईक यांनी ३० मे पूर्वी कुरुंदवाड आगाराला ८ नवीन बसेस देण्यात येतील. तसेच कुरुंदवाड आगार मालकीच्या इतरत्र असणाऱ्या एसटी बसेस पुन्हा कुरुंदवाड आगाराच्या ताब्यात देवून ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.

कुरुंदवाड आगारामध्ये एसटी बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. या आगारामध्ये वाहक चालक यांचीही संख्या अपुरी आहे अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यामुळे अनेक एसटी फेऱ्या अचानक रद्द करण्यात येतात. आगारामध्ये ६ चालक २० वाहक ८ कंट्रोलर १ वाहतूक निरीक्षक १ सहाय्यक वाहतूक निरीक्षक १ लेखपाल ५ मेकॅनिक एवढ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे.

 याचा शिरोळ तालुक्यातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील एसटी पूर्ववत कराव्यात. तसेच कुरुंदवाड आगाराच्या मालकीची असलेल्या इतरत्र देण्यात आलेल्या एसटी बसेस पुन्हा आगारात परत आणाव्यात. आणि नवीन एसटी बसेस द्याव्यात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी. ‌अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्य जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

या प्रश्नी प्रवीणभाई माणगावे यांनी महायुती सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याशी संपर्क साधून महायुती सरकारातील घटक पक्षातील कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागू नये याकरिता त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भूमिका मांडली. त्यामुळे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आपल्या दालनात या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित केली होती.

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बोलावलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे महाव्यवस्थापक माधव कुसेकर, चेतन हसबणीस, श्री मैदें, प्रवीणभाई माणगावे, जनता दल सेक्युलर पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव पटणे, यांच्यासह अधिकारी उपस्थितीत होते. 

या बैठकीत प्रवीणभाई माणगावे यांनी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगारातील वस्तुनिष्ठ माहिती मंत्री महोदयांना सांगून शिरोळ तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी एसटी बसेसची संख्या वाढवण्याची मागणी केली. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ३० मे पूर्वी कुरुंदवाड आगाराला ८ नवीन बसेस देण्यात येतील. तसेच या आगाराच्या मालकीच्या इतर आगारात असणाऱ्या सर्व एसटी बसेस कुरुंदवाड आगाराच्या ताब्यात देण्यात येतील. तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व एसटी फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील असे आश्वासन दिले. 

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनामुळे या प्रश्नावरचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती प्रवीणभाई माणगावे यांनी दिली.