पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर येथील नगरपरिषदेचे व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांनी विकसित केलेले पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान सध्या शेवटची घटका मोजत आहे. स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये उद्यान व्यवस्थित नसल्याने शहरातील नागरिकांमधून पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा होत असलेल्या जयसिंगपूर शहरांमध्ये बाग बगीचा सुव्यवस्थित नसल्याने नागरिकांना व महिला सायंकाळी विसावा घेण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी सुव्यवस्थित उद्यानाची गरज आहे. शहरामध्ये उद्यान सुव्यवस्थित अस्तित्वात नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. शाहूनगर परिसरात असलेल्या नेहरू उद्यानाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे या उद्यानामध्ये हिरवळ नसून त्या ठिकाणी रोटावेटर मारून जमीन सपाट केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अनेक झाडाझुडपांना पाणी नसल्यामुळे झाडे झुडपे वाळत आहेत. खेळण्यासाठी पाळणे आहेत मात्र या पाळण्याला नारळाच्या काट्यांचा आधार मुलांना घ्यावा लागत आहे. खेळण्यासाठी घसरगुंडी, चक्री व्यवस्थित नसल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नाही बसण्यासाठी वृद्ध व महिलांना बाकडे असून नसल्यासारखे आहेत. बागेत सर्व ठिकाणी पाला पाचोळा जमा झाल्याने बागेची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत पालिका प्रशासनाने शहरातील श्रीमंत जयसिंग महाराज उद्यान व नेहरू उद्यान सुशोभित करावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.
