महापालिकेचे ठेकेदार खूष..!
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
गेली वर्षानुवर्षे पालिकेकडे अडकलेली थकीत देणी हातात पडल्याने महापालिकेतील ठेकेदारांसह कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी सुखावले आहेत. लेखा शाखेकडे प्राप्त झालेली 31 मार्च पर्यंतची सर्व थकीत देणी अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
महापालिकेत रुपांतर झाल्यानंतरही नगरपालिकेच्या कार्यकाळापासून ठेकेदार, कर्मचारी, सेवानिवृत्त पेन्शनरांची देणी प्रलंबित होते. ती मिळावीत यासाठी सातत्याने विविध संघटनांचा पाठपुरावा सुरु होता. मात्र पालिकेचे आर्थिक बजेट कोलमडल्याने देणी देण्यास टाळाटाळ सुरु होती. त्यातच आयुक्तांच्या खुर्चीचा खेळ सुरु झाल्याने या मागण्यांकडे कोणी लक्ष दिले नव्हते.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वत: हून बदली करुन घेत मॅटमधील तक्रार मागे घेतली आणि आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विविध विभागातील थकीत देणी यासंदर्भाती आढावा घेतला. आणि 31 मार्च पर्यंत लेखा शाखाकडे आलेली सर्व बिलं भागविण्यास प्राधान्य दिले. यास भरीव निधीची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी घरफाळा, पाणीपट्टी, दुकानगाळे भाडे वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामास लावली. आणि त्यांना यात धडपडीत यशही आले. चांगली वसुली करण्यात कर विभागाला चांगले यश आले. त्यामुळेच 31 मार्चपर्यंतची जास्तीजास्त देणी भागवण्यात आली. आयुक्तांच्या या धडपडीमुळे ठेकेदार सुखावले असून यापुढेही अशाच पद्धतीने कामकाज सुरु राहिले तर दर्जेदार कामे करता येतील. अशी अपेक्षा ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.
