Spread the love

विकास कामांच्या शुभारंभाकडे पदाधिकाऱ्यांची पाठ

विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)
हातकणंगले शहरासाठी 10 कोटींचा निधी मिळाला. या निधीतून विविध विकास कामांचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. तथापी या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या बहुतांशी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे शहरातील शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य असल्याचे दिसते. निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी कुणाच्या पथ्यावर पडते ते पहावे लागेल.
माजी जिल्हा प्रमुख शिवसेना नेते मुरलीधर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करुन शहरातील विकास कामांसाठी 10 कोंटींचा निधी खेचून आणला. या निधीतून पाईपलाईन दुरुस्ती. प्राथमिक शाळा इमारत, यासह अन्य विकास कामे केली जाणार आहेत. नगरपंचाय अचारसंहिता कोणत्याक्षणी लागू शकते. त्यामुळे या विकास कामांचा रविवारी तातडीने शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांचे निमंत्रण सर्व पक्षिय नेते, पदाधिकाऱ्यांना दिले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, ठाकरे सेना, भाजपच्ो पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. मात्र ज्या पक्षाच्या नेत्यांनी धडपड करुन विकास निधी आणला त्याच शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी या कार्यक्रमासाठी येण्याचे टाळले. व्यासपीठावरुनही मान्यवरांनी ही खंत बोलून दाखवली. सभागृहात शिवसेनेचे 10 नगरसेवक होते.

नाराजी दूर करण्याचे आव्हान
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिवाचे रान करुन प्रचार केला. मात्र काही दिवसातच धुसफूस सुरु झाली. नगरपंचायत निवडणुकी पूर्वी ही नाराजी दूर होणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणुकीत फटका बसू शकतो. यासाठी जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.