Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

आज 11 मे आहे. भारताच्या इतिहासात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कारण, 27 वर्षांपूर्वी 11 मे 1998 रोजी भारतानं राजस्थानातील पोखरण येथे ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत पाच अणुचाचण्या केल्या होत्या. या चाचण्या केवळ भारताच्या अणुशक्तीचं प्रदर्शन नव्हतं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल होतं. त्यावेळी पोखरणमधील अणुचाचण्यांमुळं जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती. अटलबिहारी वाजपेयी सरकारनं पोखरणमध्ये चाचण्या करून जगाला आश्चर्यचकित केलं होतं. या चाचणीमुळं पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत खळबळ उडाली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण करण्यात आलं होतं. पोखरण अणुचाचण्यांचं स्मरण करण्यासाठी आणि देशातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 11 मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा : याच पार्श्‌‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1998 च्या पोखरण अणुचाचण्यांचं स्मरण केलं आणि हे अभियान यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना सलाम केला. त्यांनी हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या भारताच्या संकल्पाचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेवर अलिकडेच वाढलेल्या तणावानंतर घोषित केलेल्या युद्धबंदीनंतर नरेंद्र मोदींचं विधान समोर आलं आहे, जे धोरणात्मक विराम दर्शवतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रसंगाचा उल्लेख ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा म्हणून केलं आहे. ते म्हणाले, ”राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा! हा दिवस आपल्या शास्त्रज्ञांवर अभिमान बाळगण्याचा आणि 1998 च्या पोखरण चाचण्यांचे स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. आपल्या देशाच्या विकास प्रवासात, विशेषत: स्वावलंबनाच्या दिशेनं, हा एक मैलाचा दगड होता.”

तंत्रज्ञानाचा वापर मानवतेची उन्नती करण्यासाठी… : पोखरणमधील अणुचाचण्या, ज्यांचं सांकेतिक नाव ‘शक्ती’ होतं. त्या भारताच्या तांत्रिक कौशल्याचं आणि आत्मनिर्भरतेचं एक महत्त्वाचं प्रदर्शन होत्या. या चाचण्यांमुळं जगाला हे दिसून आलं की, भारत केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज भारत अवकाश, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल नवोन्मेष आणि हरित तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. विज्ञान आणि संशोधनाद्वारे भविष्यातील पिढ्यांना सक्षम करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, ”तंत्रज्ञानाचा वापर मानवतेची उन्नती करण्यासाठी, राष्ट्र सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी केला पाहिजे.”