बह्मोस क्षेपणास्त्रे लखनौमध्येही तयार होणार, संरक्षण मंर्त्यांच्या हस्ते युनिटचं उद्धाटन
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
गेले काही दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती होती. काल भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाले. यानंतर युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि.11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे बह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्धाटन केलं. यावेळी, ”आपण ज्या परिस्थितीचा सामना करत आहोत. ते पाहता, माझ्यासाठी दिल्लीत राहणं महत्त्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
जगाला भारताची ताकद दाखवून दिली : राजनाथ सिंह म्हणाले की, ”बह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीच्या उद्धाटनानिमित्त आज तुमच्याशी बोलण्यास मला खूप आनंद होत आहे. मला स्वत: उपस्थित राहायचे होते, पण मी का येऊ शकलो नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आपण ज्या परिस्थितीचा सामना करत आहोत ते पाहता, दिल्लीत असणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळं, मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी संपर्क साधत आहे. तसंच आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. 1998 मध्ये या दिवशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अणुचाचण्या केल्या आणि जगाला भारताची ताकद दाखवून दिली. ती चाचणी आपल्या शास्त्रज्ञांच्या, अभियंत्यांच्या, संरक्षण कर्मचाऱ्यांच्या आणि इतर अनेक भागधारकांच्या अथक प्रयत्नांचे परिणाम होती,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
सामर्थ्याच्या दृढनिश्चयाचं प्रदर्शन : याचबरोबर, ऑपरेशन सिंदूरबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, ”ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचं आणि लष्करी सामर्थ्याच्या दृढनिश्चयाचं प्रदर्शन आहे. तसंच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं आहे की, जेव्हा- जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करेल, तेव्हा सीमेपलीकडील जमीन देखील दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या मालकांसाठी सुरक्षित राहणार नाही.”
ऑपरेशन सिंदूरद्वारे न्याय मिळवून दिला : पुढं राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, ”ज्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांनी भारत मातेच्या मुकुटावर (काश्मीर) हल्ला केला आणि अनेक कुटुंबांचे ‘सिंदूर’ पुसून टाकले त्यांना भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे न्याय मिळवून दिला. त्यामुळं संपूर्ण देश भारतीय सशस्त्र दलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. तसंच भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केलं नाही, परंतु पाकिस्ताननं केवळ भारतातील नागरी क्षेत्रांना लक्ष्य केलं नाही तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही केवळ सीमेजवळील पाकिस्तानी सैन्याच्या आस्थापनांनाच लक्ष्य केलं नाही तर पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमध्येही भारतीय सशस्त्र दलांची गर्जना ऐकू आली, ” असंही राजनाथ सिंह म्हणाले.
