Spread the love

दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला. दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या घटनेमागे पाकिस्तान असल्याचं समोर आलं. जगभरातून पाकिस्तानचा निषेध नोंदवणयात आला. तर भारताकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं? याची प्रतीक्षा सगळ्यांना होती. त्यानंतर 6 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला आणि चोख उत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्‌‍वस्त करण्यात आले. यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती बहुदा युद्ध घोषित होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांची शस्त्रविराम केला. यानंतर काही तासातच पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केली. ज्यानंतर त्या कारवाईलाही उत्तर देण्यात आलं. दरम्यान या सगळ्याबाबत आता प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?

”पाकिस्तान काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही. कधी जबाबदारी घेतात कधी नाकारतात. त्यांना जो धडा शिकवायचा तो आपण शिकवला आहे. लवकर काही कुरापती काढतील असं वाटत नाही. कारण दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे म्होरके संपले आहेत. पाकिस्तान डुबलेला देश आहे. त्यांचं आणखी काय नुकसान होणार? आपला देश वेगाने पुढे जाणारा देश आहे. शस्त्रविराम होत असेल तर चांगली गोष्ट आहे. ऑपरेशन सिंदूरमधून आपण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. योग्य वेळी संघर्ष थांबला तर दोन्ही देशांकडचा फायदा असतो. अमेरिकेने सुरुवातीला सांगितलं की आम्ही मधे पडणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये अघोषित युद्धच होतं. अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रविरामही जाहीर केला. पण दोन तासांनी पाकिस्तानने आगळीक केली. सकाळपासून अशा काही गोष्टी अद्याप तरी घडलेल्या नाहीत. जम्मू आणि काश्मीर या ठिकाणीही परिस्थिती पूर्ववत होते आहे. ही चांगली गोष्ट आहे. आपल्या लोकांवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा पुरेपूर बदला भारताने घेतला आहे.”

राज ठाकरे म्हणाले ते त्यांचं मत झालं-छगन भुजबळ

राज ठाकरे जे काही म्हणाले ते त्यांचं मत झालं. मात्र जेव्हा देशावर दहशतवादी हल्ला झाला आणि 26 भगिनींचं कुंकू पुसण्यात आलं तेव्हा संपूर्ण देशातून एकच आवाज होता तो म्हणजे बदला. तो बदला आपल्या देशाने पुरेपूर पद्धतीने घेतला आहे. 1971 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ताही आपल्या मंर्त्यांनी इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. इंदिरा गांधींनी अमेरिकेला ठणकावलं होतं हे बरोबरच आहे. मात्र इंदिरा गांधींनीही योग्य वेळी युद्ध विराम केला ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यावेळीही युद्ध विराम करावाच लागला होता. आत्ताही विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर आपण शस्त्र विराम केला आहे. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.