हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा
पोलिसांनी 8 मे रोजी हैदराबादमधील एका नामांकित रुग्णालयात काम करणाऱ्या 34 वर्षीय महिला डॉक्टरला आणि एका डिलीव्हरी एजंटला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून 53 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खात्रीशीर माहितीच्या आधारे, रायदुर्गम पोलीस ठाण्याच्या एका पथकाने शहरातील एका रेस्टॉरंटजवळ या दोघांना अटक केली. डिलिव्हरी एजंट हा महिला डॉक्टरला तिच्या कारमध्ये कोकेनचे पाकिट देत असताना ही कारवाई करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नमता नावाच्या या डॉक्टरने मुंबई येथील सप्लायर वंश धक्कर याच्याकडून व्हॉट्सॲपवरून अंमली पदार्थ मागवले होते आणि यासाठी 4 मे रोजी तिने 5 लाख रुपये ऑनलाईन पाठवून दिले होते.
धक्करने त्याचा सहकारी बालकृष्ण उर्फ राम प्यार राम (38) याच्यामार्फत हैदराबादला ड्रग्ज पाठवल्याचा आरोप आहे. बालकृष्ण हा या सप्लायरचा डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो.
पोलिसांनी आरोपींकडून कोकेन, 10,000 रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. ड्रग्ज देत असताना पोलिसांनी कारवाई करत या दोघांना ताब्यात घेतलं.
तपासादरम्यान या प्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे, पोलिसांनी सांगितले की नमताला ड्रग्जचे व्यसन होते आणि तिने गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जवर सुमारे 70 लाख रुपये खर्च केले आहेत.दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
