Spread the love

हवाई दलाने जाहीर केली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर हल्ले-प्रतिहल्ले झाले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी झाल्याची घोषणा शनिवारी केली होती. यानंतर दोन्ही देशांनी हल्ले थांबवले होते. परंतु, पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला. याबाबत आता भारतीय हवाई दलानं महत्वाची एक्स पोस्ट केली आहे.

भारतीय हवाई दलांना पोस्टमध्ये काय म्हटलं : भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरबाबत एक्स सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ”ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. याबाबत योग्यवेळी माहिती सर्वांना दिली जाईल. या काळात चुकीच्या माहितीचं प्रसारण करू नये. ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे भारतीय हवाई दलानं अचूकतेनं यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगानं हे ऑपरेशन विचारपूर्वक पार पाडण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई सुरू असल्यानं कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये.

लष्करी कारवाई थांबवण्याचा करार : भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि सैन्य कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारतानं सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे. पुढेही अशीच भूमिका घेत राहिल, अशी भूमिका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी मांडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती. यावेळी ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या देशांनी शस्त्रबंदीवर सहमती दर्शवली आहे. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन.”

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून क्षेपणास्त्र हल्ला : जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधल्या नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

पंतप्रधान मोदींनी दिली ऑपरेशनला नाव : 22 एप्रिला रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांच्या पतींची त्यांच्या डोळ्यादेखत हत्या केली होती. या हल्ल्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता सैन्यदलाने राबविलेल्या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले.