कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ले येथील घटना
पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ले ता करवीर (कोतोली फाट्या जवळ) लक्ष्मी पॅलेस हॉल समोर मेघा कंपनीच्या पाण्याच्या टॅंकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विनोद कृष्णा सुतार (वय ४६) राहणार (थेरगाव पूणे) यांचा मृत्यू झाला.
घटना स्थळावरुण व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विनोद सुतार हे पुण्याहून सासुरवाडीला पिशवी (बांबवडे)ता. शाहूवाडी येथे कार्यक्रमासाठी पत्नी व मुलांसमवेत दोन दिवसांपूर्वी आले होते. ते रविवारी दुपारी दुचाकी वरुन कोल्हापूरला भावाच्या मुलाला रुग्णालयात पाहण्यासाठी जात होते.ते दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास केर्ले येथे आले असता लक्ष्मी पॅलेस हॉल समोर पाठीमागून आलेल्या मेघा कंपनीच्या पाण्याच्या टॅंकरने जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकी बाजुला गेली व सुतार यांच्या अंगावरुण आणी डोक्यावरुन टॅंकरचे पुढील चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची माहिती फोन वरून पंडित नलवडे, केर्ले गावचे पोलिस पाटील सचिन भोपळे यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.
या घटना स्थळी हायवे सुरक्षा पोलिस उपनिरीक्षक सुभाष मोरे व त्यांची सहकारी व करवीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ हजर झाले.पुढील तपास संजय चव्हाण(पो.हवालदार) व सचिन जाधव करीत आहेत.या घटने नंतर टॅंकर चालक मुस्ताक अन्सारी (मेघा हायवे कंपनी कॅम्प केर्ली)हा गाडी सोडून पळून गेला.
विनोद सुतार हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करीत होते.त्यांच्या मागे आई, पत्नी दोन मुली असा परीवार आहे.
