Spread the love

कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीपासून अस्वस्थता असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांत पुन्हा एकदा एकसंधपणा साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कळंबा येथील स्नेहभोजन होऊन पंधरा दिवस होण्यापूर्वीच पुन्हा एकदा काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये प्रीतीभोजन झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. खुलेपणाने राजकारणावर चर्चा झाली. या बैठकीला तीसहून अधिक माजी नगरसेवकात उपस्थित होते. त्या साऱ्यांनी सतेज पाटील यांच्यासोबत कायम राहण्याची ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या दुरुस्त करुन आगामी निवडणूक ताकतीने लढविण्याचा व जिंकण्याचा निर्धारही झाला. माजी नगरसेवकाचे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हॉटेल आहे, त्या ठिकाणी सगळे एकवटले होते.

काँग्रेसचे दहा ते बारा  नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा वेगावली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांतही अंतर्गत धुसफूस पाहावयास मिळाली.  विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी, माघारी नाटय, नगरसेवकांची सह्यांची मोहिम या साऱ्याची किनार त्या पाठीमागे आहे. नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी नगरसेवक एकसंध आहेत, हे दर्शविण्यासाठी डिनर डिप्लोमसी सुरू आहे. दोन आठवडयापूर्वी कळंबा-गारगोटी  रोडवरील हॉटेलमध्ये स्नेहभोजन झाले होते. त्यानंतर शनिवारी, दहा मे रोजी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी प्रीतीभोजन आयोजित केले होते.