इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
सांगली रस्ता करतांना खोदण्यात आलेल्या मुरुमाबाबत चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. ५२ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अद्याप रस्त्यांची कामे सुरु आहेत, तर रस्त्यांच्या गुणत्तेबाबत तक्रारी होत आहेत. परंतू रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असेही आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदे मध्ये सांगीतले.
मुरुम चोरी प्रकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागांने महापालिकेला पत्र दिले होते. त्यावर महापालिकेकडून खुल्या जागेवर मुरुम टाकण्याबाबत सार्वजिनक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केल्याचे सांगत ५२ कोटीच्या निधीतून विविध सहा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींची संबंधित विभागाच्या सर्व अधिका-यांच्या आढावा बैठका घेवून शहनिशा करून तक्रारींची निर्गत केली आहे, असे आमदार आवाडे यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या कलानगर ते चंदुर फाटा या रस्त्याचे कामासाठी ५ कोटी १६ लाख रुपये मंजूर असून या रस्त्याचे काम तीन टप्प्यात सुरु आहे. सध्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. कलानगर येथे रस्त्याचे काम करण्यात आल्यानंतर नळ जोडणी देण्यासाठी खोदाई केली असता रस्त्यासाठी अतिरिक्त मुरुम वापरण्यात आल्याच्या तक्रारी विविध सामाजिक माध्यमातून होत आहेत. पण तसा कोणताही प्रकार नसून ही तांत्रिक बाब आहे. या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे पॅचवर्क केले जाणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पर्यवेक्षक संतोष पाटील, महापालिकेचे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, शाखा अभियंता बाजी कांबळे, माजी नगरसेवक दीपक सुर्वे, सुनिल तोडकर, राजू बोंद्रे, शेखर शहा, इम्रान मकानदार, प्रशांत सपाटे आदी उपस्थीत होते.
