कोलकाता / महान कार्य वृत्तसेवा
येथील ईडन गार्डनवर झालेल्या आयपीएलच्या 57व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या आयपीएल भविष्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला धोनी : केकेआर विरुद्ध चेन्नईच्या दोन विकेटने विजयानंतर धोनी म्हणाला, ”मी 42 (43) वर्षांचा आहे, मी बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे. माझा शेवटचा सामना कोणता असू शकते हे त्यांना माहित नसल्यामुळे चाहते मला पाहण्यासाठी प्रत्येक मैदानावर येत आहेत. हे लोकांचं प्रेम आणि आदर आहे. या हंगामानंतर मी पुन्हा कठोर परिश्रम करेन आणि माझे शरीर हे दबाव सहन करु शकते की नाही ते पाहीन. अजून काहीही ठरवलेले नाही. चाहत्यांकडून मला मिळालेले प्रेम अद्भुत आहे.”
स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तरुण खेळाडूंना संधी : संघात तरुण खेळाडूंना मिळणाऱ्या संधीबाबत धोनी म्हणाला, ‘आता आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो आहोत, त्यामुळं आम्ही तरुणांना संधी देऊ जेणेकरुन ते वेगवेगळ्या परिस्थितीत कसे कामगिरी करतात ते पाहू शकतील. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या कितीही मजबूत असलात तरी धावा करालच असं नाही, पण जर विचारसरणी योग्य असेल तर तुम्ही सातत्यानं चांगली कामगिरी करु शकता,’ असंही धोनी म्हणाला.
2023 मध्ये धोनीच्या गुडघ्यावर झाली होती शस्त्रक्रिया : 2023 मध्ये धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तेव्हापासून तो तंदुरुस्तीसाठी संघर्ष करत आहे. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अलीकडेच कबूल केलं की धोनी सलग 10 षटकं फलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. या हंगामात सीएसकेसाठी चढ-उतार भरलेले राहिले आहेत आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता उर्वरित सामन्यांमध्ये बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा संघाचा विचार आहे. दुसरीकडे, या पराभवामुळं कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कमकुवत झाल्या आहेत. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, आता सगळं सोपं आहे, आपल्याला आमचे उर्वरित दोन्ही सामने जिंकायचे आहेत, मग पाहूया काय होतं.
सीएसकेने दोन विकेट्सनं जिंकला सामना : 7 मे रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा 2 विकेट्सनं पराभव केला. शेवटच्या षटकात, सीएसकेला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता होती. आंद्रे रसेलच्या पहिल्याच चेंडूवर सीएसकेचा कर्णधार धोनीनं षटकार मारला. यानंतर, त्यांनी दोन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सनं 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्जनं विजयाचं लक्ष्य 19.4 षटकांत 8 गडी गमावून पूर्ण केलं. चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमदला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानं 4 षटकांत 31 धावा देऊन 4 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
