नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
सैन्यदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल राजकीय नेत्यांना माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत राजकीय नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत सखोल माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्री मंत्री जे. पी. नड्डा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मलिकर्जुन खरगे हेदेखील बैठकीला उपस्थित राहिले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बैठकीपूर्वी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सशस्त्र दलांनी यशस्वीरित्या पार पाडलं आहे. पंतप्रधान मोदींचे हेतू जगाला यापूर्वीच माहित आहेत. अशा परिस्थितीत आपण विभागलं जाऊ नये, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व भारतीयांनी एकत्र राहावं.
