यळगूड / महान कार्य वृत्तसेवा
नियोजनाचा अभाव आणि केवळ प्रभाग पाच मध्ये केंद्रित झालेले लक्ष यामुळे यळगूड ग्रामपंचायत गावातील अन्य भागात प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्यातही अपयशी ठरत असताना आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतचे अपयश चव्हाट्यावर आलं आहे. येथील प्रसिद्ध सहकार उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयाच्या अगदी जवळच असणाऱ्या कागल इचलकरंजी मार्गांवरील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याचा नाहक त्रास जवळच असणाऱ्या शेतकऱ्यांना होत असून शेतात तण कमी आणि कचराच जास्त झाला असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे .
समोर आलेल्या या भयान वास्तवामुळे पंचायतच्या घंटागाड्या प्रभाग पाच सोडणार आहेत की नाही. असा सवाल निर्माण होत आहे. याला या प्रभागातील उपसरपंच यांची एकाधिकारशाही कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. तसेच अगदी सार्वजनिक विद्युत खांबावर ब्लब बसवायचा म्हटलं तरी मागणी करणारा कोणत्या राजकीय गटाचा आहे. हे तपासून सुरु असलेला नियोजन शून्य कारभार ग्रामपंचायतच्या अपयशाला कारणीभूत ठरत आहे. पंचायत कारभाऱ्यांनी लोक काय बोलत नाहीत. याचा फायदा घ्यायचं सोडून गैरफायदा घ्यायला सुरवात केली असल्याचे मत जुने जाणते लोक व्यक्त करत आहेत .
पंचायतमध्ये सुरु असलेल्या एकाधिकारशाहिला वैतागून अनेक ग्रा.प.सदस्यांनी पंचायकतडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. एकदा सोडून चार पाच वेळा तळ्याततळे केंदाळ काढून झाले असेल तर पंचायतने गावच्या वेशीवर स्वागताला तयार असलेल्या कचऱ्याच्या ढीगाकडे थोडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तरच चव्हाट्यावर आलेल्या अपयशावर पांघरून टाकल्या सारखे होईल. असा सल्ला देखील लोकांच्यातून पंचायतला दिला जात आहे. वेळीच येथील कचऱ्याचे ढीग हटवले नाहीत, तर मात्र कायम शेतमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरणारे शेतकरी कचऱ्याच्या ढीगासाठी रस्त्यावर उतरले तर मात्र कोणाला आश्यर्य वाटायला नको.

