इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
बनावट चलनी नोटा तयार करुन खपवल्या जात असल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन बनावट नोटा खपवणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक तपास करुन पोलिसांनी बनावट नोटा तयार करणारे मुख्य संशयित अर्जुन दळवी, ओंकार साळुंखे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या १० बनावट नोटा जप्त केल्या असून दोघांना न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहापुरमधील पंकज पोवार यांच्या पानपट्टीत प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार यांनी दोनवेळा सिगारेट खरेदी केली. दोन्हीवेळा दोघांनी २०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्याप्रकरणी पंकज पोवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात ४ मे रोजी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
बनावट नोटा खपवणाऱ्या प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे कसून तपास करुन बनावट नोटा तयार करणारे मुख्य आरोपी अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे या दोघांना साळुंखे यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांनी बनावट नोटा तयार करत असल्याची कबुलीही दिली आहे. या गुन्ह्यातील चारही आरोपींकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या एकूण १० नोटा जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या दळवी आणि साळुंखे या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
