कोल्हापूर विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
मागील विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असली तरी जिल्ह्यातील सध्य राजकीय परिस्थितीत महायुतीचे पारडे जड आहे. त्यामुळे भविष्यातील विधान परिषद निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे न्यायालयीन कचाट्यात सापडल्या होत्या. मंगळवारी या संदर्भात न्यायालयाने अंतिम निर्णय दिला. या निवडणुका म्हणजे विधान परिषदेचा भावी आमदार ठरवणाऱ्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे महायुती मोठ्या ताकदीने उतरणार हे निश्चित आहे. सध्या जिल्ह्यातील 1 खासदार आणि 10 ही आमदार महायुतीचे आहेत. त्या दोन मंत्री जिल्ह्यातील आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती आणि नगरसेवकांच्या माध्यमातून विधान परिषदेचा आमदार निवडला जातो. त्यामुळे महायुती या निवडणुका आरपारची लढाई म्हणूनच लढणार आहे.
सतेज पाटलांची एकाकी झुंज
राष्ट्रवादीने इंडिया आघाडीची साथ सोडली तर शरद पवार यांचे जिल्ह्यात फारसे प्राबल्य दिसत नाही. उर्वरीत पक्ष नावालाच शिल्लक आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांना या निवडणुकांमध्ये एकाकी लढावं लागणार आहे. आता पहावे लागले या निवडणुकीत ते कसा समाना करतात.
