Spread the love

व्यापारी वर्गात खळबळ ; किती नोटा चलनात आल्याची चर्चा

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)

चार दिवसांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट चलनी नोटा खपवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे वस्त्रानगरी इचलकरंजीत खळबळ माजली असून व्यापारी दुकानदार व्यवहार करताना खबरदारी घेत आहेत. पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे नोटा खपवण्यास आलेल्या दोघा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली. मात्र यातील मुख्य दोघे संशयित अद्यापही फरारी आहेत, हे दोघेही पोलीस रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असून त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहेच. शिवाय इचलकरंजी शहरात बनावट नोटांचे रॅकेट सुरू आहे का असेल तर ते उध्वस्त करण्याचे आव्हान आता पोलिसांच्या समोर उभे राहिले आहे.

शहापुरमधील विनायक हायस्कुल परिसरात पंकज संभाजी पोवार  यांचे माऊली नामक पान शॉप आहे. 1 मे रोजी दुपारी प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार या दोघे या पानपट्टीत आले. यावेळी 200 रुपयांची नकली नोट असल्याचे माहित असनाताही खरी असल्याचे भासवत पंकजचे वडील संभाजी यांच्याकडून 20 रुपयांचे सिगारेट खरेदी करून उर्वरीत 180 रुपये परत घेऊन गेले. पुन्हा 3 मे रोजी याच दोघांनी नकली 200 रुपये देऊन 20 रुपयांचे सिगारेट घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पंकज पोवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस तपासात प्रमोद आणि अवधुत पोवार यांनी त्या नकली नोटा अर्जुन दळवी  आणि ओंकार साळुंखे  यांच्याकडून 20 टक्के कमिशनवर घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी प्रमोद पोवार आणि अवधुत पोवार या दोघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे हे फरारी झाले आहेत.

वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. अगदी किरकोळ दुकानदारांपासून बाजारपेठेत मोठ्या दुकानापर्यंत आर्थिक व्यवहार होत असतात. याचाच फायदा घेत बनावट नोटा खपवण्याचा प्रकार इचलकरंजी शहरात होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस खात्याने संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी देखील केली जात आहे.

केवळ दोन नोटा सापडल्या मात्र यातील काही नोटा चलनात आल्याची शक्यता नाकारता येत नाही बनावट नोटांचे मोठे रॅकेटच शहरात कार्यरत असल्याची चर्चा आहे. फरारी संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

नोटांची तस्करी करणार्‍या संशयीतांनी या बनावट नोटा नेमक्या कुणाकडून घेतल्या होत्या, की स्वतःच तयार करत होत्या याचा तपास होणे गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून ही  पोलिसांनी तपास सुरू केल्याचे समजते.

ऑनलाइन पेमेंटचा आग्रह

बनावट नोटा खपवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील छोटे-मोठे व्यवसायिक दुकानदार व्यापारी यांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे व्यवहार करताना प्रत्येक नोट खातरजमा करत तपासून घेतली जात आहे शिवाय बरेच व्यापारी ऑनलाइन पेमेंट करण्याचा आग्रह धरताना दिसत आहेत