Spread the love

गडवासीयांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या ; अन्यथा तीव्र जनआंदोलन

माजी आ.सत्यजित पाटील-सरूडकर यांचा इशारा

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळगडाचा जागतिक वरसास्थळ यादीत समावेश करण्यास गडवासीयांचा प्रारंभापासूनच विरोध आहे. वर्ल्ड हेरिटेज निर्णयाचा स्थानिक व्यवसाय तसेच नागरिकांच्या जीवनमानावर कोणते परिणाम उद्भवणार आहेत, याबाबतची वस्तुस्थितीदर्शी माहिती न देता सरकारने कोणाच्या तरी हट्टापायी ‘वर्ल्ड हेरिटेज’ निर्णयाची सक्ती करू नये. अशी विनंती माजी आ.सत्यजित पाटील-सरूडकर राज्य सरकारला केली आहे. पन्हाळगडाचा जागतिक वरसास्थळ यादीत समावेशासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याच्या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माजी आ.पाटील यांनी आपली भूमिका मांडली. गडवासीयांना विश्वासात घेऊनच पुढचे पाऊल उचलावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही माजी आ.पाटील यांनी सरकारला दिला आहे.

माजी आ. पाटील म्हणाले, भारतीय पुरातत्व खात्याच्या जाचक निर्बंधामुळे आधीच पन्हाळगड वासीय अडचणीत असताना त्यात जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाल्यास गडावरील उरलेसुरले पर्यटन आणि अवलंबित व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. गडवासीयांना उदरनिर्वाहाचा पर्याय उरणार नाही, याची भीती आहे.

 स्थानिक नागरिकांनी स्वतः गडाची देखभाल आणि स्वच्छता जबाबदारी पेलली आहे. याउलट सरकारी अधिकारी हे बदलीने येतील जातील. पर्यटकही भेट देतील न देतील परंतु मूळ पन्हाळा गडवासीयांचे वर्षानुवर्षे वास्तव्य राहिले आहे. पुढेही राहणार आहे. याचा शासनाने विचार करावा, आणि सर्वप्रथम स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन ‘वर्ल्ड हेरिटेज’बाबत पाऊले उचलावीत. सरकारने निर्णयाचा अट्टाहास सोडावा. गडवासियांप्रमाणेच आपलाही या ‘वर्ल्ड हेरिटेज’च्या निर्णयाला ठाम विरोध असल्याचे सांगत तरीही एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही माजी आ.पाटील यांनी सरकारला दिला आहे.