“जेनेसिस ” ला जिल्ह्याची समन्वय संस्था म्हणून दर्जा देणार
राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा
‘कमवा आणि शिका’ योजनेमुळे मुलींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकरीता उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने मुलींमध्ये तांत्रिक कौशल्य विकसीत होण्यास मदत होत आहे. शिक्षणाबरोबर रोजगाराचाही पर्याय उपलब्ध होत असून या योजनेचा जास्तीत जास्त मुलींनी फायदा घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘शिका व कमवा’ ही योजना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे पाऊल आहे. राधानगरी येथिल जेनेसिस कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या कक्षाचे उद्घाटन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जेनेसिस कॉलेजमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली ही योजना अल्पावधीतच नावारुपास आली असून संस्थापक अध्यक्ष अभिजीत तायशेटे व त्यांचे कुटुंबीय यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेचा प्रगतीचा आलेख वाढला असून या संस्थेला जिल्ह्याची समन्वय संस्था म्हणून दर्जा देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जनता दलाचे वसंत पाटील, तहसीलदार अनिता देशमुख, अवंतिका तायशेटे, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, नरेशजी चंदवाणी, रविश पाटील, विजय महाडीक, राहूल चिकोडे, यादवसो, इंद्रजित पाटील, सुहास निंबाळकर, दादासो सांगावकर, सुभाष पाटील, तुकाराम केसरकर, आरती तायशेटे, सरपंच शिवाजी चौगले, सरपंच सिमा शेटके, भरत कासार, दिपक कदम आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अभिजीत तायशेटे यांनी केले. विविध क्षेत्रात नियुक्ती मिळालेल्या गुणवंतांचा यावेळी संस्थेच्या वतीने छ. शाहुंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
ना. पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व राज्यातील विविध संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ‘शिका व कमवा’ या उपक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत केली जात असून, उद्योगधंद्यातील कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीला पूरक ठरत आहे. या उपक्रमात राज्यातील इच्छुक संस्था, उद्योगसमूह आणि संबंधित तज्ञ यांना सहभाग घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने धोरणात्मक रूपरेषा निश्चित केली आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अल्पमुदतीचे शासनमान्य पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, त्याद्वारे मुलींना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.
या वेळी ‘कमवा आणि शिका’ तत्त्वावर शिक्षण घेणाऱ्या मुलींचा भत्ता वाढविण्याची मागणी काही मुलींनी केली असता त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. कार्यक्रमाला कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी, कॉलेज स्टाफ, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल कुंभार, तर आभार प्राचार्य व प्रशासकीय प्रमुख शोभराज माळवी यांनी मानले.
