Spread the love

८६ डोंगर दुर्गम भागातील धनगर वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा

शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील १३१ महसूल गावासह २५० वाड्या- वस्त्यातून तालुका दुर्गम डोंगर सह्याद्रीच्या कपारीत वसला आहे तालुक्यातून वारणा, कडवी, कासारी या तीन नद्या वाहत वाहतात. पावसाळ्यात तोंडावर नदीतील पाणी सुटले जाते. त्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात घटत असते अतिशय अतिउष्ण उन्हामुळे धनगर वाड्या वस्त्यांवर पाण्याचे तळे आटली आहेत. पावसाळा सुरू व्हायला अजून एक महिना असताना नदीपात्र कोरडी पडली असून भूजल पातळी देखील खालावली आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील धनगर वाड्यावर असेल पाण्याची पातळी खळावली असल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महिलांना पाण्यासाठी डोंगर कपाऱ्यातून पायपीट करावी लागत आहे.

 शाहुवाडी तालुकात पावसाळा तेवढाच उन्हाळा असतो डोंगर भाग तितकाच पाणीदार म्हणून ओळखला जातो. तरीही ग्रामीण जनतेला भीषण पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. ‘सूर्यदेवही आग ओकू लागल्याने दिवसा घराबाहेर पडणेही मुश्किल झाल्यामुळे पाणी शोधण्याचे काम ‘अग्निदिव्यच’ होऊन बसले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्त्रोतही आटले आहेत. तांब्याभर पाण्यासाठी ओढ्यातील झऱ्यांवर या लोकांना तासं तास ताठकळत बसावे लागते. प्रशासनाच्या समन्वया अभावी अस्तित्व गमावलेल्या पाणी योजना, झरे-ओढ्यांचे उपजत जलस्त्रोतही आटले आहेत. यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे.

 पाणी टंचाईग्रस्त गावांची व वाड्यांची यादी प्रशासनाकडे आहे. दरवर्षी या गावांत उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. तरीही कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत आराखड्यात २ गावे, ४२ वाड्यांवरील पाणीपुरवठा उपाययोजनेसाठी अंदाजित खर्च ३० लाख ४० हजार तर एप्रिल ते जून मधील आराखड्यात ३ गावे व ४४ वाड्यांसाठी अंदाजित रक्कम ४९ लाख प्रस्तावित आहे. तालुक्यात पाण्याच्या योजनांवर करोडो रूपये शासनाकडून खर्च झाले असले तरी अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या का असा प्रश्‍न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्या –

आराखड्यात भाडळे, मांजरे, येळवण जुगाई ही गावे व पणुंद्रेपैकी (भोसलेवाडी, पाटेवाडी, सुकामाळ, सुतारवाडी, जाधववाडी, म्हाळसावडे धनगरवाडा), माण धनगरवाडा, बुरंबाळ धनगरवाडा, आंबापैकी (धनगरवाडा, चाळणवाडी), आंबर्डे पैकी करपेवाडी, उखळू पैकी (धनगरवाडा, अंबाईवाडा), खोतवाडी धनगरवाडा, गोगवेपैकी ठमकेवाडी, कांडवण धनगरवाडा, मानोलीपैकी (कोळेकरवाडी, धाऊडवाडा), अमेणी पैकी ( खोतवाडी, खोंगेवाडी), येळवन जुगाईंपैकी (पांढरेपाणी, पठाराचा धनगरवाडा), कासार्डे (धोपेश्वरवाडा, खेळता धनगरवाडा), शित्तुर वारुणपैकी (ढवळेवाडी, राघुचा धनगरवाडा, पेगुचा धनगरवाडा, तळीचा धनगरवाडा), बर्कीपैकी बुरानवाडी, परखंदळेपैकी मांडलाईवाडी, आकुर्लेपैकी शिराळकरवाडी, वरेवाडीपैकी कुंभारवाडी, आळतुर धनगरवाडा, कडवेपैकी शिंदेवाडी, घोळसवडेपैकी मुसलमानवाडी,  वालुर धनगरवाडा, ऐनवाडी धनगरवाडी, गजापूरपैकी भाततळी वसाहत, माणगांव कारंडेवाडी, ओकोलीपैकी कडेवाडी आदींसह अन्य वाड्यावर पाणीटंचाईच्या झळा आहेत. शाहूवाडीत ३ गावे आणि ८६ वाड्या पाणी टंचाईग्रस्त आहेत. तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवीन विंधन विहिरी खोदणे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि बैलगाडी तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्याला ७९ लाख ४० हजार रुपये खर्च करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे

पाणीटंचाई आराखड्यात अपेक्षित खर्च

नवीन विंधन विहीर :  ३६ वाड्या २३ लाख ४० हजार

खाजगी विहीर अधिग्रहन करणे : ३ गावे, ३१ वाड्या १८ लाख १० हजार

टँकरने, बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे : १९ वाडी-वस्तीवर ३८ लाख

एकूण ३ गावे आणि ८६ वाड्या :  ७९ लाख ४० हजारांचा खर्च अपेक्षित