Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

24 फेब्रुवारी या मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातील मुद्रक हा दिवस ‌‘जागतिक मुद्रण दिन‌’ म्हणून साजरा करतात. याचे औचित्य साधुन यावर्षीही प्रिंटर्स असोसिएशन, इचलकरंजी तर्फे इचलकरंजी शहर व परिसरातील बहुसंख्य मुद्रक आणि त्यांचा परिवार एकत्र येऊन हा मुद्रण दिन ‌‘कौटुंबिक स्नेह मेळावा‌’ म्हणून उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी नगरीचे नूतन आमदार डॉ. राहुल आवाडे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोसिएशनचे सल्लागार कलगौडा पाटील हे होते. तसेच भारत एक्स्पोचे तुषार धोटे, असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण हेरवाडे, सभासद सत्यम केकले, गौरव अलमलकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते.

स्नेह मेळाव्याच्या सुरुवातीस नेहमीप्रमाणे मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन आणि छोट्याशा रोपट्यास पाणी घालून या सुंदर सोहळ्याची सुरुवात केली . स्वागत व प्रास्ताविक प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम शिंदे यांनी केले. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून गौरविले गेलेल्या इचलकरंजी शहरांमध्ये गेली बारा वर्षे झाली इचलकरंजी आणि परिसरातील सर्व मुद्रक एकत्र येऊन जागतिक मुद्रण दिन हा ‌‘मुद्रक परिवाराचा कौटुंबिक स्नेह मेळावा‌’ म्हणून साजरा करतो. मुद्रकांच्या व्यवसायीक अडी अडचणी दूर करणेचा प्रयत्न करणे, मुद्रण व्यवसायात आलेल्या आधुनिक गोष्टींची माहिती मुद्रकांना व्हावी म्हणून मोठमोठ्या प्रिंटींग प्रदर्शनास एकत्रीत भेटी देणे व विविध प्रकारच्या माहीतीपर कार्यशाळांचे आयोजन करणे आणि मुद्रकांना एकसंघ करण्याच्या दृष्टीने गेली बारा वर्षे झाले आमचे असोशियन उत्तमकार्य करत आहे. जगातल्या पहिल्या तीन व्यवसायात येणाऱ्या मुद्रण व्यवसायातील मुद्रक व त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या अडी अडचणींची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने व केंद्रशासनाने त्या सोडविण्यााठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सिताराम शिंदे यांनी आमदार आवाडे यांच्या समोर मांडली अन्‌‍ त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न ही आमदारांच्याकडून होईल असा विश्वास व्यक्त केला.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या अनोख्या शैलीतून मुद्रकांच्या या मेळाव्यात बहुमोल मार्गदर्शन केले. मुद्रण कला कशी आहे आणि सध्याचे तिचे वास्तव काय आहे याबद्दलचे सखोल ज्ञान राहुल आवाडे यांना आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणातून दर्शवून दिले. मुद्रकांनी सोशल मिडीयाच्या काळात आपली मुद्रण कला टीकविली पाहीजे. त्यासाठी आधुनिक ॲप व विविध तंत्रज्ञान शिकुन घेतले पाहीजे आणि आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेला पाहीजे. तसेच मुद्रण व्यवसायिकांच्या अडीअडचणी आमदारकीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे ओशासन दिले. आमदार आवाडे यांनी आतापर्यंत अनेक असोसिएशनचे कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती परंतु प्रिंटर्स असोसिएशन, इचलकरंजी वाल्यांच्या कार्यक्रमाचे खास वेगळेपण आहे. असे आपल्या भाषणात कौतुकास्पद उद्गार काढले. बेंगलोर येथे प्रथमच होणाऱ्या भारत एक्सपो या मुद्रण व्यवसायातील विविध मशिनरींच्या प्रदर्शनाच्या रोड शो साठी आलेले भारत एक्स्पो चे प्रतिनिधी तुषारजी धोटे यांनी मुद्रकांनी आपला व्यवसाय करीत असताना कुटुंबालाही योग्य न्याय दिला पाहिजे याची त्रिसूत्री आपल्या मार्गदर्शनातून सांगितली. तसेच दक्षिण भारतात प्रथमच आयोजित केलेल्या या ‌‘भारत एक्सपोला‌‘ सर्व मुद्रकांनी भरघोस संख्येने उपस्थित राहावे व मुद्रण व्यवसायात आलेल्या नवनवीन आधुनिक मशनरी आपल्याकडे आणून आपला व्यवसायात प्रगतीसाधावी आणि आधुनिकतेशी आपल्या व्यवसायाची नाळ जोडून ठेवावी. असे बहुमोल मार्गदर्शन तुषारजी धोटे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे कार्यकारी सदस्य विनय पेटकर, मोहन मोरे, मुद्रा मासिकाचे संपादक सुदर्शनजी बोगा यांचेही मार्गदर्शन लाभले.
असोसिएशनच्या माध्यमातून प्रतिवर्षी मुद्रण व्यवसायात कार्यरत असणाऱ्या जुन्या जाणत्या मुद्रकाला ‌‘जीवन गौरव पुरस्कार‌’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षी शिवशक्ती पॅकेजिंग इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा शिवबसू शिवलिंग खोत यांना आमदार राहूल आवाडे यांच्या हस्ते प्रिंटर्स असोसिएशन, इचलकरंजी चा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . यावेळी श्री. खोत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवन कार्याचा आढावा मांडला. या व्यवसायात कसा प्रवेश केला, त्यावेळची व्यवसायाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याबद्दलचे वास्तव ही श्री. खोत यांनी आपल्या मनोगतातून मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रिंटर्स असोसिएशनचे सल्लागार कलगौडा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व मुद्रकांनी एकत्र राहून आपल्या व्यवसायातील अडीअडचणी एकमेकांबरोबर वाटून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपला व्यवसाय आनंदाने करावा. असोसिएशनच्या रुपाने आपण सर्वजण एकत्र आलो, ज्या उद्देशाने येथे एकत्रित झालो आहोत, तो उद्देश्य साध्य करण्यासाठी आपला असाच सतत क्रियाशिल सहभाग आवश्यक आहे. आपल्या व्यवसायात अनेक आव्हाने असू शकतात, पण त्या आव्हानांना तोंड देताना, आपला एकत्रित संघर्ष आणि आपल्या व्यवसायावरील दृढ निष्ठा हेच आपल्याला यशस्वी बनवेल. माझ्या अपेक्षा आहेत की, या सोहळ्यात मान्यवरांच्या विचारांतून आपल्याला मिळालेले नवीन ज्ञान, प्रेरणा आणि अनुभव जीवनात नक्की उपयोगी पडतील. आपल्या सर्वांच्या एकीचा विचार आणि योगदान यामुळे आपल्याला व्यवसायात व आपल्या व्यवसायिक संबंधात सकारात्मक बदल साधता येईल याचबरोबर आपले घर काम पाहून आपल्या जोडीदारास व्यवसायात ही मदत करणाऱ्या गृहलक्ष्मींचाही सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट म्हणजे कार्यक्रमस्थळी लावलेले वेगवेळ्या कंपनीचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. असोसिएशनचे सभासद बंटी जैन यांनी घेतलेले आनंददायी व विनोदी खेळ. ज्यामध्ये आमच्या मुद्रक परिवारातले बहुसंख्य सभासद आणि त्यांचा परिवार आनंदाने
सहभागी झाला व खेळांचा आनंद घेतला. या कौटुंबिक सोहळ्यास इचलकरंजी आणि परिसरातून ग्राफिक डिझायनर, मुद्रक, बायंडर्स, पेपर विक्रेते व्यवसायिक आणि परिवार यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. आलासे लॉन येथे सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला स्वागत आणि पाहुण्यांची ओळख असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय निकम यांनी करून दिली. तसेच आभार असोसिएशनचे सचिव रणजीत पाटील यांनी मांडले. या सोहळ्याचे उत्तम सूत्रसंचालन असोसिएशनचे खजिनदार स्वप्निल नायकवाडे व त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया नायकवाडे यांनी केले. हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष सिताराम शिंदे, उपाध्यक्ष संजय निकम, सचिव रणजीत पाटील, खजिनदार स्वप्निल नायकवाडे, संचालक विनोद मद्यापगोळ, नरेंद्र हरवंदे, महादेव साळी, दीपक वस्त्रे, गणेश वरुटे, राकेश रुग्गे, सुधाकर बडवे, दीपक फाटक, सल्लागार श्री. दिनेश कुलकर्णी, शंकर हेरवाडे, संजय आगलावे, कलगौडा पाटील यांनी प्रयत्न केले.