जयसिंगपूर /महान कार्य वृत्तसेवा
मार्चच्या एडींगच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने वसुली मोहीम गतिमान केली. झोपडपट्ट्यांमधील १२०० मिळकत धारकांना नोटीसा लागू केल्या असून कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यानंतरही कर न भरणाऱ्या मिळकत धारकांची मिळकतीवरील असिसमेंटवरून वहिवाटदार म्हणून नोंदी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील झोपडपट्टीतील मिळकत धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर नगरपालिका कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वसुली पथकाने गेल्या महिन्याभरापासून मोहीम गतिमान केली आहे. सुरुवातीच्या काळात नागरिकांना आवाहन करण्यात आले नंतरच्या काळात नोटीसा लागू करण्यात आल्या. आता थेट मिळकती सील करण्याची कारवाई सुरू असून यानंतरही मिळकत धारकांनी कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
लाखोंचा कर थकविणाऱ्या मिळकती प्रशासनाने सील केल्या आहेत. शिवाय शहराचा बहुतांश भाग झोपडपट्टी विभागात येतो. विविध झोपडपट्ट्यातील बाराशे मिळकत धारकांना प्रशासनाने नोटीसा लागू केल्या आहेत. त्यांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली असून यानंतरही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मिळकत धारकांची असेसमेंटवरून वहिवाटदार म्हणून असलेली नोंद रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.