मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील विविध नेत्यांनी भाषणं केली. तसंच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केले. याकरता त्यांनी महाकुंभ मेळ्यात गेलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समाचार घेतला.
राज ठाकरे म्हणाले, ”मुंबईला मेळावा बैठक लावली होती. काहीजण आजारी होते म्हणून आले नव्हते. त्यातील 5-6 जणांनी सांगितले की कुंभला गेले होते. मी म्हटले गधड्यांनो करता कशाला पापे? मी हेही विचारले की आल्यावर अंघोळ केलीत ना? हे बाळा नांदगांवकर छोट्याश्या कमंडलूमधून गंगेचे पाणी घेऊन आले. मी हड म्हटले, मी नाही घेणार.”
दोन वर्षे तोंडाला फडके बांधून फिरलात अन् आता
”पूर्वीच्या काळी ठीक होतं. पण आता मी सोशल मीडियावर पाहतोय, तिथे गेलेली माणसं, बाया त्या पाण्याने काखेत वगैरे घासतायत. आणि बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की हे घ्या गंगेचं पाणी! कोण पिएल ते पाणी? आताच करोना गेलाय. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. मी कित्येक स्वीमिंग पूल पाहिलेत की उद्धाटनाच्या वेळी निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे होऊ लागले. कोण त्यात जाऊन पडेल?”, असा मिकि संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
”त्यांनी तिथे काहीतरी केलंय, ते मी इथे पितोय. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. या देशात एकही नदी स्वच्छ नाहीय. आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा पाहतो तिथे स्वच्छ नद्या असतात. ते काय तिथे माता-बिता म्हणत नाहीत. आमच्याकडे सर्व प्रदुषणाचं पाणी आतमध्ये. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी की गंगा स्वच्छ होणार. राज कपूरने यांनीही यावर चित्रपटही काढला होता. लोकांना वाटले झाली गंगा स्वच्छ. लोक म्हणाले अशी गंगा असेल तर आम्हीही अंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा अजून काही स्वच्छ करायला तयार नाहीत. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर या”, असे आवाहनही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
