जयपूर/महान कार्य वृत्तसेवा
जयपूरमधील ग्राहक वाद निवारण आयोगाने पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने विमल पान मसाला बनवणाऱ्या जेबी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विमल कुमार अग्रवाल यांनाही अशीच नोटीस बजावली आहे. यावेळी त्यांनी सर्वांना 19 मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
”सुनावणीची तारीख सकाळी 10 वाजता निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा तुमच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्यात अयशस्वी झालात, तर वर नमूद केलेल्या सुनावणीच्या तारखेला तक्रारीचा एकतर्फी निर्णय घेतला जाईल,” असे आयोगाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी 5 मार्च रोजी हिंदीमध्ये जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
आयोगाने सर्व कलाकारांना आणि पान मसाला उत्पादक कंपनीला नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल दाखल होईपर्यंत कलाकारांकडून किंवा कंपनीकडून कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया आलेली नाही.
जयपूर येथील वकील योगेंद्र सिंह बडियाल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जाहिरातीत ”दाने दाणे में है केसर का दम” असे म्हटले आहे. यामुळे जेबी इंडस्ट्रीज कोट्यवधी रुपये कमवत आहे आणि सामान्य लोक नियमितपणे पान मसाल्याचे सेवन करत आहेत जे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
68 वर्षीय वकिलाने केसरयुक्त गुटख्याच्या नावाखाली लोकांना विमल पान मसाला खरेदी करण्यासाठी आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप केला आहे. सामान्य लोक केसरच्या नावाखाली गोंधळात पडत आहेत. मात्र या उत्पादनात केशरसारखे कोणतेही पदार्थ मिसळलेले नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.
बाजारात केशरची किंमत प्रति किलो 4 लाख रुपये आहे आणि पान मसाल्याची किंमत फक्त 5 रुपये आहे, असे त्यांनी सांगितलं आहे. ”केसर मिसळणं शक्य नाही, त्याचा सुगंध तर सोडाच,” असे ते म्हणाले आहेत. बडियाल यांनी खोटी माहिती पसरवल्याबद्दल आणि सर्वसामान्यांची फसवणूक केल्याबद्दल उत्पादक कंपनी आणि उत्पादनाच्या जाहिरातीत सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
”या चुकीच्या प्रसिद्धी आणि प्रसारामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचे नुकसान होत आहे, ज्यासाठी अर्जदार स्वतंत्रपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी आरोपींना दंड ठोठावण्याची आणि सामान्यांच्या हितासाठी तात्काळ पान मसाल्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
