Spread the love

ग्वालियर /महान कार्य वृत्तसेवा
सध्याच्या रीलच्या जमान्यात अनेकदा लाईक्स मिळवण्यासाठी जीव धोक्यात घातला जातो. असाच प्रकार मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडला आहे. येथे रील बनवण्याच्या नादात दीर आणि वहिनीने आपल्यासह इमारतीमधील सर्व रहिवाशांचा जीव धोक्यात घातला. रीलच्या नादात इतका जबरदस्त स्फोट झाला की इमारत हादरली. रील बनवण्यासाठी रुममध्ये धूर दिसावा यासाठी त्यांनी चक्क एलपीजी गॅस सोडला होता. यानंतर लाईट सुरु करताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालियर येथील गोला मंदिर रोड येथील द लिगेसी नावाच्या सात मजली इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. येथे वास्तव्यास असणारा अनिल जाट आपली वहिनी रंजना जाट हिच्यासह फ्लॅटमध्ये रील बनवत होता. रीलमध्ये त्यांना धूर दाखवायचा होता. धूर दाखवण्यासाठी त्यांनी फ्लॅटमध्ये एलपीजी गॅस सोडला. यानंतर रील शूट करण्यासाठी त्यांनी हॅलोजन सुरु करताच मोठा स्फोट झाला.
स्फोटानंतर संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. स्फोट इतका जबरदस्त होता की, फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीमुळे लिफ्टही तुटली आणि आसपास असणाऱ्या फ्लॅटच्या भिंतींचेही नुकसान झाले आहे. या स्फोटात रील बनवणारे अनिल जाट आणि रंजना जाट होरपळले आहेत. या दुर्घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक धावपळ करताना दिसत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. ग्वालियरचे एसपी धर्मवीर सिंह यांनी सांगितलं की, रील बनवण्याच्या प्रयत्नात एलपीजी सिलेंडर गॅस सोडण्यात आला. इलेक्ट्रिक बोर्ड स्विच ऑन करताच मोठा स्फोट झाला. याप्रकरणी रंजना आणि अनिल या दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मोबाईल फोनवर असे फोटो आणि व्हिडीओ सापडले आहेत ज्यामध्ये ती गॅस लीक करताना दिसत आहेत. तिथे अनिल जाट व्हिडीओ तयार करत होता. या दोघांनी निष्काळजीपणा केल्याचं समोर आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.