Spread the love

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
राज्य सरकारने दावोसमध्ये औद्योगिक गुंतवणूक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. या झालेल्या गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाव्यातून किमान एक लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधान मानू, या शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी शुक्रवारी विधान परिषदेत भूमिका मांडताना ते म्हणाले, दावोसमध्ये झालेल्या करारावेळी महाराष्ट्रातील कंपन्या किती होत्या हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे झालेल्या गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण होण्याचा सरकारने दावा केला आहे. एमपीएससीद्वारे भरली जाणारी पदे आणि राज्यातील किमान अडीच लाख जागांवरील नोकरभरतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही. तो आला असता तर एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.