यड्राव : महान कार्य वृत्तसेवा
गावाच्या तलावामध्ये कारखान्याचा कचरा टाकल्याप्रकरणी सरिता कृषी इंडस्ट्रीजवर ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारखान्यावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, तो तत्काळ वसूल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावातील तलावात कारखान्याचा कचरा टाकला जात असल्याने ग्रामस्थांनी आयशर गाडी ग्रामपंचायतीकडे पकडून दिली. यामुळे तलावाचे प्रदूषण होत असून, गावकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याबाबत ग्रामपंचायतीने कारखान्याच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवली व सरिता कृषी इंडस्ट्रीजवर थेट आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तब्बल पाच हजार रुपयांचा दंड कारखान्यावर ठोठावला असून, तो तात्काळ वसूल करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत केले असून, भविष्यात पुन्हा अशी घटना घडल्यास अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीने अधिक सतर्क राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
