Spread the love

नाशिक/महान कार्य वृत्तसेवा
मविप्रसंस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये दहावीच्या भूमितीचा पेपर सोडवत असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पंखा पडल्यानं त्यात विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेदरम्यान मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये घडली. जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनं पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नामांकित मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये दहावीचा भूमितीचा पेपर सुरू होता. सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात गेले. मराठा महाविद्यालयाच्या दगडी इमारतीमागील नवीन इमारतीमध्येही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका वर्गामध्ये विद्यार्थी पेपर सोडवण्यात मग्न होते. अशात पेपरची वेळ संपण्यास अवघे 15 ते 20 मिनिटे शिल्लक होते. तितक्यात यश पडोळ नावाच्या विद्यार्थ्याच्या डोक्याजवळ फॅन पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला मार लागल्यानं तो जखमी झाला. ही बाब शिक्षक आणि मुख्याध्यापकांना समजताच घटनेचं गांभीर्य ओळखून सर्वांनी मदतकार्य सुरु केले. शिक्षकांनी तत्काळ जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. यानंतर महाविद्यालयाकडून जखमी विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधत माहिती देण्यात आली. त्यानुसार पालकांनीही रुग्णालयात धाव घेत मुलाची विचारपूस केली. पेपर सुटल्यानंतर मराठा महाविद्यालयाकडून तत्काळ फॅन दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेण्यात येऊन फॅनची दुरुस्ती करण्यात आली. मात्र या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला.