विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेच्या मालकीची असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा सूत दलालांकडून फुकटात वापर सुरू आहे. या उद्यानाच्या देखभाल दुरूस्तासाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसे खर्च करायचे आणि रोज सकाळी सुताचा व्यापार करून दलाल आपले खिसे भरून घराकडे जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा उद्योग सुरू आहे. यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणात कर बुडत आहे. येथील व्यापारावर महापालिकेने कर आकारणी करून उत्पन्नाने स्त्रोत वाढवावे, अशी मागणी प्रामाणिकपणे न चुकता कर भरणाऱ्या करदात्यांतून होत आहे. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. या उद्यानातूनही उत्पन्नात भर पडू शकते. आता पहावे लागेल नूतन आयुक्त पल्लवी पाटील ही बाब किती गांभीर्याने घेतात.
नगरपालिकेच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी ज्येष्ठ आणि लहान मुलांना विरंगुळा मिळावा म्हणून शॉपींग सेंटरच्या पाठीमागील बाजूस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उद्यान उभा केले. सायंकाळच्यावेळी कामाच्या दगदगीतून जेष्ठ नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना मोकळी हवा मिळावी, त्यांचे आरोग्य चांगले रहावे हा उदात्त हेतू हे उद्यान उभे करण्याच्या पाठीमागे होता. परंतू, या उद्यानावर सूत दलालांनीच गेल्या कित्येक वर्षापासून कब्जा केलेला आहे. रोज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत दलाल येथे सुताचा सौदा करतात आणि रोखीने कमिशन खिशात घालून आपआपल्या घराकडे जातात. या दलाल आणि व्यापाऱ्यांचा महापालिकेला एक टक्काही लाभ मिळत नाही उलट या ठिकाणी झाडांना पाणी घालणे, रोजची झाडलोट, साफसार्फ करणे, उद्यानाची निगा राखण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. यासाठी येथे नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाकाठी काही लाखांचा भार महापालिकेच्य तिजोरीवर पडत आहे. या प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. इस्टेट विभागानेही याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. मध्यंतरी पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या संदर्भात कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. परंतू, राजकिय दबावामुळे त्यांना फारसे यश आलेले नाही.

आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज..
इचलकरंजीत वस्त्रोद्योग नगरी आहे. सूत, कापड या उद्योगावर येथील अर्थचक्र चालते. हे खरे असलेतरी सार्वजनिक जागेचा वापर करून स्वत:चा खिसा भरण्याचा प्रकार कितपत योग्य आहे? यासाठी काहीतरी कर लावला पाहिजे जेणेकरून महापालिकेच्या अर्थकारणात सुधारणा होईल आणि सर्वसामान्यांना या जमा झालेल्या करातून चांगल्या सुविधा देण्यासाठी हातभार लागेल, अशी भावना महापालिकेचे प्रामाणिक करदाते व्यक्त करत आहेत. आयुक्त पल्लवी पाटील यांनी या प्रकाराकडे विशेष लक्ष द्यावे, अशीही लोकमागणी आहे.