गंगानगर/ संतोष पाटील
येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होवून दोन महिने लोटले तरी केंद्राच्या सहकार मंत्रालयाकडून अद्याप चेअरमन निवडीला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने अस्वस्थ असलेले पंचगंगाचे काभाऱ्यानी थेट राजधानी गाठली आहे. कदाचित ते दोन दिवसात केंद्रीय सहकरमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काही अट घालून चेअरमन निवडीचे सोपस्कार पार पाडले जाईल अशी चर्चा पंचगंगा वर्तुळात सुरु आहे.
शिरोळ, कागल, हातकणंगलेसह सिमा भागात कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारल्याने या कारखान्याची नोंदणी मल्टीस्टेट कायद्याअंतर्गत झाली. त्यामुळे नव्याने अस्तीत्वात आलेल्या केंद्राच्या सहकार मंत्रालयाचा अंकुश या कारखान्यावर राहिला आहे. कारखान्याची नुकतच बिनविरोध निवडणूक पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. 19 जानेवारीस जिल्हाधिकाऱ्यांनी 17 जागांसाठी 17 अर्ज आल्याची वार्षिक सभेत घोषणा केली. केंद्रीय सहकार प्राधिकरणाकडून नवनियुक्त संचालक मंडळास मान्यता मिळाल्यानंतर 24 जानेवारीस चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड अशी कायद्या तरतुद आहे. तथापि निवडणूक होवून महिन्यांचा कालावधी लोटला तरीही केंद्राच्या सहकार विभागाने नवनिर्वाचीत संचालक मंडळावर मोहर उठवली नाही.
चार दिवसांपासून दिल्लीत तळ
लवकरात लवकर चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडणूक घ्यावी अशी मागणी नेते पी. एम. पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र केंद्राकडून परवानी आल्याशिवाय चेअरमन निवडणूक घेता येणार नाही. असे सांगण्यात आले. त्यामुळे पंचगंगा वर्तुळात कमालीची अस्वस्थता पसरली. यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिचे प्रसंगी सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेवून परवानगी मिळवावी असा मतप्रवाह पुढे आला. आणि सोमवारपासून पी. एम. पाटील, कार्यकारी संचालक नंदकुमार भोरे याच्यासह काही कारभारी राजधानीत तळ ठोकून आहेत. आता पहावे लागेल राजधानी दौरा कितपत यशस्वी होते.
राजधानीतील मुक्काम वाढणार
बुधवारी सहकार प्राधिकरणाची बैठक होते. मात्र याच दिवशी महाशिवरात्रीची सार्वजनीक सुट्टी असल्याने ही बैठक झाली नसल्याचे कळते. त्यामुळे आत पुढील बुधवारीच बैठक होईल असे दिसते. त्यामुळे राजधानीतील मुक्काम आणखी आठ दिवस वाढणार आहे. ता पर्यंत हरिद्वार, ऋषीकेश, दिल्ली सवारी आदीचे नियोजन कारभाऱ्यांना करावे लागणार आहे.