उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर स्वाभिमानीला रामराम ठोकून पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. मुंबई येथील मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवास्थानी शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. मिणचेकर यांच्या गळ्यात भगवा स्कार्प घालत हातात भगवा झेंडा देवून स्वागत केले. मिणचेकर यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाल आणख बळ मिळाले आहे. त्यांचा भविष्यात चांगला सन्मान करु, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. मिणचेकर यांना पुन्हा स्वगृही आणण्यात खासदार धैर्यशील माने, जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी मिणचेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देवून आशिर्वाद घेतले.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर काही तांत्रीक अडचणींमुळे डॉ. मिणचेकर यांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेला उमेदवारीचा विचार होईल असे त्यांना वाटत होते. मात्र ठाकरे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले परिणामी नाराज झालेल्या मिणचेकर यांनी अपरिहार्य कारणास्तव स्वाभिमीनीत प्रवेश करुन हातकणंगले विधानसभा निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला तरी दुसऱ्या दिवसांपासून ते कामाला लागले. लोकांच्या गाठीभेटी घेवून संपर्क कायम ठेवला. दरम्यानच्या काळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करण्याचे धोरण ठेवले. याची जबाबदारी खासदार धैर्यशील माने, जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांच्यावर सोपविण्यात आली. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांना शिवसेनेत घेवून राजू शेट्टी यांना धक्का दिला. तर आता मिणचेकर यांनाही पक्षात सहभागी करुन घेत स्वाभिमानीला खिंडार पाडले. या पक्ष प्रवेशावेळी मंत्र उदय सामंत, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने, हातकणंगले तालुका लाडकी बहिण योजना समितीचे अध्यक्ष, चोकाकचे माजी सरपंच अविनाश बनगे, हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील, उद्योगपती अरविंद खोत, गजानन जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार- डॉ. मिणचेकर
मी मूळचा शिवसैनिक आहे. त्यामुळे पक्षातील शिस्त मला नविन नाही. काही अडचणींमुळे काही दिवसांसाठी दुसरीकडे गेलो होतो. परंतु आता मूळ प्रवाहात आलो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी प्रामणिक पणे पार पडणार आहे. असे पक्ष प्रवेशानंतर डॉ. मिणचेकर यांनी सांगितले.
जाधव- मिणचेकर वादाला पूर्ण विराम मिळणार
शिवसेनेत असताना डॉ. मिणचेकर आणि मुरलीधर जाधव यांच्यात टोकाचा वाद होता. गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदावरुन या संघर्षाने टोक गाठले. राजू शेट्टी यांच्यावर टिका केल्याने जाधव यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर त्यांन शिवसेनेत प्रवेश केला. आता डॉ. मिणचेकरही शिवसेनेत दाखल झाले आहेत. दोघांनीही जुन्या वादाला पूर्ण विराम देवून शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा निष्ठावंत शिवसैनिकांच्या आहेत.