यळगूड/महान कार्य वृत्तसेवा
येथील ग्रामपंचायत इमारत आणि संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सहकार उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयासमोरून थेट तळ कोकणात जाणाऱ्या रस्त्यालागत असणाऱ्या गटारीतील सांडपाणी ऐन उन्हाळ्यात रस्त्यावर आल्याने यळगूड ग्रामपंचायतचे अपयश पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थ आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रचंड मोठया प्रमाणात सुटलेल्या दुर्गंधीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने येथील सुमधुर दूध विक्री करणाऱ्या व्यावसायिकाना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सधन ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या यळगूड ग्रामपंचायतमध्ये सहकार महर्षी वसंतराव मोहिते गटाची सत्ता आहे आणि सुजितसिह मोहिते सरपंच आहेत. गेल्या काही दिवसात ग्रामपंचायत इमारत, पेयजल योजना आदी कामांना गती मिळाली आहे. मात्र प्राथमिक सोयी आणि सुविधाकडे ग्रा. पं. चे दुर्लक्ष झाले असल्याचे रस्त्यावर आलेल्या सांडपाण्यामुळे ठळक झाले आहे. चालू आर्थिक वर्षाची समाप्ती होत असल्याने ग्रा. पं. ने ग्रामस्थांकडे घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीचा तगादा लावला. त्याच पद्धतीचा जोर पंचायतने गावात प्राथमिक सोयी सुविधा देण्यासाठी लावायला हवा असे लोकांचे म्हणणे आहे.

सोयी सुविधाचे तीन तेरा वाजणार
उपसरपंच हा सगळ्या गावचा असतो. मात्र सध्याचे उपसरपंच सागर चौगुले हे केवळ आपल्या प्रभागाचाच विचार करतात असा आरोप काही सदस्यांचा आहे. गावातील इतर प्रभागातील काही समस्या मांडण्याचा प्रयत्न केला तर बघूया करूया यापलीकडे काहीच पदरात पडत नसल्याने अनेक ग्रामपंचायत सदस्य कमालीचे नाराज आहेत. सदस्यांच्या या आरोपात जर तथ्य असेल तर मात्र गावातील सोयी सुविधाचे तीन तेरा वाजणार यात शंका नाही.
पतीराज आणि नाराजी
सुरवातीच्या काळात अनेक ग्रामपंचायत सदस्य प्रभागात पाणी सोडायला लावून ते प्रत्येक घरात मिळाले की नाही याची खातरजमा करून घ्यायचे तसेच स्वतः उभे राहून गटारी स्वच्छ करून घ्यायचे मात्र काही दिवसापासून यळगूड ग्रामपंचायतमध्ये पतीराज सुरु झाल्याने यातील काही सदस्यांनी ग्रा. पं. कडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे गावचा कारभार हाकणाऱ्या प्रमुख मंडळींचा या महिला सदस्यांच्या पतींवर प्रचंड मोठया प्रमाणावर विस्वास आहे, अशी धारणा पाठ फिरवलेल्या सदस्यांची झाली आहे.