Spread the love

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्यात विजसेवा पुरवण्याचे काम महावितरण च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे महावितरण च्या वीज ग्राहकांची संख्या ही खूप मोठी आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात महावितरणच्या वतीने अदानी समूहाचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. या कालावधीत अनेक ग्राहकांना नवीन मीटरच्या रिडींग मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या असून वीज बील वाढून आल्याच्या तक्रारी आहेत. राज्यभरात याविषयीचे अनेक प्रकार समोर येत असताना हातकणंगले शहर परिसरात जुने मीटर सुस्थितीत असतानाही अनेक ठिकाणी महावितरणकडून अदानी समूहाचे “नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर” बसविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटरच्या रिडींग बाबत तफावती असताना, अनेक नागरिकांनी त्याबाबत तक्रारी ही दाखल केलेल्या आहेत. पण तरीसुद्धा हातकणंगले शहरात महावितरण कडून स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याचे प्रकार होत आहेत. 

      प्रीपेड विज मीटर म्हणजे ग्राहकाचे लूट करण्याचा नवीन फंडा असून मोबाईलच्या सेवेप्रमाणे ग्राहकाला खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. प्रीपेड मीटर बसवल्यामुळे वीज ग्राहकांची मनमानी लूट या खाजगी कंपन्या करू शकतात. त्यामुळे हातकणंगले गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये सदर मीटर बसवण्यावरून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या हितास्तव सदर स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे व जिथे नवीन मीटर बसवले आहेत ते तात्काळ पूर्व स्थितीत सुरु करावे अन्यथा त्याविरुद्ध सर्व नागरिकांच्यावतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याच्या इशारा  सर्वपक्षीय पदाधिकारी व सदस्यांनी हातकणंगले महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता श्री. रवींद्र पाटील यांना देण्यात आले.

       यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक अध्यक्ष अनिस मुजावर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले, दीपक कुन्नुरे, युवक काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष सचिन बोराडे,  अतुल मंडपे, माजी पंचायत समिती उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक राजू इंगवले, नगरसेवक दीनानाथ मोरे, विजय चौगुले, सागर नलवडे, विजय निंबाळकर, पंडित निंबाळकर, विजय जाधव, ईश्वर यमगर, प्रकाश खांडेकर, मनोज इंगवले, आशिष चव्हाण, आप्पासो कदम, चंद्रकांत जाधव, गुरूदास चव्हाण आदी उपस्थित होते.