मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
प्रचंड बहुमतासह महायुतीच्या सरकारने सत्तेत पुनरागमन केले आहे. प्रचंड बहुमत असलेल्या महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये सत्ता वाटपावरून नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे विविध मुद्यावरून सरकारमधील मंत्री, आमदार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानमंत्र दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले असल्याचे चित्र आहे. आधी सत्ता वाटप, त्यानंतर पालकमंत्री पदावरून तिढा सुरू झाला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून समांतर सरकार चालवत असल्याच्या चर्चा मंत्रालय परिसरात सुरू आहेत.
आरोपांच्या फैरीत अडकलेली महायुती अडचणीत
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजुरी दिलेले काही प्रकल्प चौकशीच्या कचाट्यात अडकले आहेत. तर, काही ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळातील काही निर्णयांचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे बीड प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्याशिवाय, धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयात घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
पीएम मोदींनी देवेंद्र फडणवीसांना कोणता कानमंत्र दिला?
वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद झाला. या दरम्यान पीएम मोदींनी प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा असा कानमंत्र दिला आहे. स्वच्छ प्रशासन असलेच पाहिजे.असे करताना कुणाचीही पर्वा करू नका असा स्पष्ट आदेश पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीमध्ये उलथापालथ?
आता पंतप्रधानांनी स्वच्छ, पारदर्शक कारभार करण्याची सूचना केल्याने महायुती सरकारमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्यदेखील वाढण्याची शक्यता आहे. आरोप असलेल्या मंर्त्यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, शिवसेनेच्या नाराजीला आता भाजप किती मनावर घेईल आणि प्रतिसाद देईल यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
