बीड/ महान कार्य वृत्तसेवा
परळी न्यायालयात 15 मार्चला धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील दोन प्रकरणावर सुनावणी होणार आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याच्या करुणा शर्मा मुंडे यांच्या तक्रारीवर सुनावणी होणार आहे तर सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा प्रकरणातही 15 मार्च रोजी परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
परळी शहराजवळील जिरेवाडी येथील जमीन फसवणूक करून खरेदी केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता आणि यात धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप ही सारंगी महाजन यांनी केला होता. परळी न्यायालयात प्रकरण सुरू आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भातील सुनावली पुढे ढकलण्यात आली आता 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे
काय आहे प्रकरण?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्या बाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, याबाबत आता 15 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नोटीस पाठवली पण पोहचलीच नाही
करूणा शर्मा यांचे वकील ॲड. चंद्रकात ठोंबरे म्हणाले, धनंजय मुंडे यांना जी नोटीस इश्यू केली होती ती परळी शहर पोलीस स्टेशनच्या कडून पाठवण्यात आली होती. मात्र ही नोटीस धनंजय मुंडे यांना अद्याप पोहचलेली नाही. आता परत ही नोटीस नाथरा याठिकाणच्या पत्त्यावर पाठवली जाणार आहे. त्यासाठी परळी ग्रामीण पोलीस ठाणे मार्फत ही नोटीस इश्यू करण्यात आली आहे.
15 मार्च रोजी सुनावणी
मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. आता न्यायालयाने 15 मार्च रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
