मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहतापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहचल्याचा पोलिसांना संशय आहे. या गैरव्यवहाराबाबत मेहताने रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना तशी कबूली जबाब दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासणीत 2024 मध्ये मेहतापर्यंत एकूण 2 कोटींचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत भाजप नेते राम कदम यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप आदमी आदमी पार्टीने केला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये आरोपी हितेश मेहताकडे अद्याप असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
सहकारी बँक बंद पाडण्यात भाजप नेते जबाबदार
दरम्यान, सहकारी बँक बंद केल्याबद्दल आम आदमी पार्टीने भाजप नेत्यांना जबाबदार धरले. महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी बँका किंवा पतसंस्थांमध्ये राजकीय पक्ष आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याची टीका आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली आहे. जेव्हा जास्त खासगी बँका नव्हत्या आणि सामान्य लोकांनी इथं खाती उघडली होती तेव्हा हे सुरु झाले. पण आज या बँका भष्टाचाराचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळेच या सर्व बँका बंद पडत आहेत असं मत धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलं.
मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे नाव पुढे
मुंबई बँकेचे प्रकरण समोर आले होते. त्याविरोधात आम्ही आवाज देखील उठवला होता. त्यात भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे नाव पुढे आले होती असे धनंजय शिंदे म्हणाले. तसेच बंद पडलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत भाजप नेते राम कदम यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही याबाबत माहिती संकलित करत असून लवकरच ती लोकांसमोर मांडणार असल्याचे धनंजय शिंदे म्हणाले.
दरम्यान, न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या 30 पेक्षा जास्त शाखा आहेत. बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच या बँकेवर ’प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
