मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 19 फेब्रुवारीला महाकुंभाला जाणार असल्याचा दावा काँग्रेस नेते अजय राय यांनी केला आहे. यावेळी अजय राय यांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, ”ही दु:खद घटना आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही सर्वांना बोलावले, पण व्यवस्था नाही.” अजय राय म्हणाले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
इटावामध्ये अजय राय म्हणाले की, ”राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आम्ही सर्वजण 19 फेब्रुवारीला महाकुंभला जाणार आहोत. तिथे हर हर महादेव असेल.” महाकुंभात स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. महाकुंभाच्या समारोपाला फार दिवस उरलेले नाहीत. त्याची मुदत 26 मार्च रोजी संपत आहे. महा कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी (15 फेब्रुवारी 2025) रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 1.36 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले आणि 13 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 52.83 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. फूटओव्हर बिजवरून उतरताना काही प्रवासी घसरून इतरांवर पडल्याची घटना घडली.
